स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करण्याच्या शासन आदेशावर कार्यवाही व्हावी ! – हिंदु महासभेची मागणी

सातारा येथील अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

सातारा, १९ मे (वार्ता.) – शासकीय आदेशानुसार २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याची काटेकोरपणे कार्यवाही व्हावी, अशी मागणी ‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

या वेळी गिरी संप्रदायाचे पू. सोमनाथगिरी महाराज, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, वृक्षमित्र रतन पाटील, हणमंतराव वाघ, महादेव कुलकर्णी, रमेश ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. महाराष्ट्र शासनाने २९ डिसेंबर २०१७ या दिवशी परिपत्रक काढून ‘२८ मे या दिवशी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करावी’, असे आदेश पूर्वीच निर्गमित केले आहेत. असे असूनही सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी होतांना दिसत नाही.

२. आपण याविषयी सातारा जिल्ह्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना २८ मे या दिवशी स्वा. सावरकर यांची जयंती साजरी करण्याचे स्मरणपत्र द्यावे. तसेच याची छायाचित्रे मागवून घ्यावीत. जी कार्यालये स्वा. सावरकर यांना अभिवादन करणे अथवा त्यांची जयंती साजरी करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.