सोलापूर, १८ मे (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) जिल्हा परिषदेसमोर १८ मे या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा’ याविषयावर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार होते. या संदर्भात सामाजिक संकेतस्थळावर आलेल्या एका ‘पोस्ट’चा संदर्भ देऊन सदरबझार पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीस आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनला प्रतिसाद देत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन स्थगित केले.
या संदर्भात समितीचे श्री. विनोद रसाळ यांसह अन्य कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील गुन्हे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. समितीचा प्रत्येक उपक्रम हा समाजहिताचा, प्रशासनाची अनुमती घेऊन आणि कायद्याचे पालन करूनच होतो. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीला मान देऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून आम्ही हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.