ईश्वरी अधिष्ठान ठेवून हिंदु राष्ट्राचे कार्य करा ! – पू. संतोषकुमार महाराज

  • अमरावती येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

  • ‘ज्ञानयोगी साधक श्री. शिरीष देशमुख’ या ग्रंथाचे प्रकाशन !

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, पू. अशोक पात्रीकर, पू. संतोषकुमार महाराज, श्री. सुनील घनवट

अमरावती, १८ मे (वार्ता.)  – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंवर होणारे आघात आणि हिंदु राष्ट्राचे होणारे लाभ लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. आता परिस्थिती अनुकूल आहे. आता नाहीतर कधीच नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्याग करावा लागणार आहे. वेळ द्यावा लागणार आहे. केवळ भारतामध्ये विश्वगुरु बनण्याची क्षमता आहे. विचारांची सुस्पष्टता ठेवून प्रामाणिकपणे कार्य करत पुढे जायचे आहे. हे सर्व ईश्वरी अधिष्ठान ठेवून करायचे आहे, असे प्रतिपादन शिवधारा आश्रमाचे पू. संतोषकुमार महाराज यांनी केले. अमरावती येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते.

ग्रंथाचे मुखपृष्ठ

पू. संतोषकुमार महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने या अधिवेशनाचा आरंभ झाला. या वेळी सनातन संस्थेच्या ‘ज्ञानयोगी साधक श्री. शिरीष देशमुख’ या ग्रंथाचे उपस्थित संतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. २० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत या वेळी हिंदुहिताचे ठराव संमत करण्यात आले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज आवश्यक असून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने भगवंताचे अधिष्ठान ठेवायला हवे. तसेच साधनेला महत्त्व देऊन हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हायला हवे.

केवळ हिंदूंच्याच मंदिराचे सरकारीकरण होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

देशामध्ये धर्मनिरपेक्ष व्यवस्था असतांना एकही मशीद किंवा चर्च यांचे सरकारीकरण होत नाही; परंतु केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते.  हिंदूंसाठी कायदे, तर अन्यांसाठी फायदे असे का ? हिंदूंची मंदिरे सरकारमुक्त झाली पाहिजेत, यासाठी प्रत्येकाने कृतीशील झाले पाहिजे.

या अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या आर्थिक षड्यंत्राविषयी प्रबोधन केले.

अधिवेशनानंतर ८ ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती बैठका घेण्याचे ठरले. सभागृहाचे विश्वस्त मंडळ आणि अजमेरा डेकोरेशनचे मालक श्री. अनुप अजमेरा यांनी अधिवेशनासाठी साहाय्य केले.