आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग ८)

पू. तनुजा ठाकूर

१. अन्नपूर्णाकक्षातील कपाटे आणि भांडी विनावापर पडून राहून खराब होत असल्याने ती कचरापेटीत टाकून द्यावी लागणे

अन्नपूर्णाकक्षात स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाणारी भांडी अस्वच्छ आणि अपवित्र असतात, याविषयी आपण आधीच्या लेखांतून समजून घेतले. अन्नपूर्णाकक्षात असणारी कपाटेही अस्वच्छ आणि अव्यवस्थित असतात. काही कपाटे पुष्कळ जुनी झालेली असतात. खाद्यपदार्थ ठेवण्यासाठीची भांडीही पिचलेली किंवा तुटलेली-फुटलेली असतात. त्या भांड्यांना हात लावल्यास त्यांचा तेलकटपणा हातांना लागतो. अनेकदा महिला ‘मॉल’मधून अनावश्यक वस्तू घरी घेऊन येतात; पण त्यांचा उपयोग होत नसल्यामुळे त्या वस्तू विनावापर तशाच पडून रहातात. त्यामुळे त्या खराब होतात. अन्नपदार्थ ठेवत असलेल्या भांड्यांना कीड लागल्यास ते थेट कचरापेटीतच टाकले जाते.

२. विनावापर असणारे साहित्य अन्य कुणाला तरी द्यावे !

‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, हे सामान्यज्ञान आजच्या लोकांना नसते. जर आपण एखादे साहित्य वापरत नसू, तर ते अन्य कुणाला तरी द्यायला हवे. एवढी साधी गोष्टही त्यांच्या लक्षात येत नाही. शीतकपाटाची (‘फ्रिज’ची) सुद्धा अशीच स्थिती असते. त्यातही अनेक वस्तू ठासून भरलेल्या असतात. थोडक्यात तुमच्या अन्नपूर्णाकक्षात एकप्रकारे रावणराज्यच असते.

३. अन्नपूर्णाकक्षाच्या दुःस्थितीमुळे तेथे लक्ष्मीदेवी किंवा अन्नपूर्णादेवी यांचे अस्तित्व कसे टिकेल ?

काही गृहिणी मला म्हणतात, ‘‘माझ्याकडे समृद्धी नांदत नाही किंवा माझ्या यजमानांना आर्थिक समस्या आहेत किंवा व्यापारात हानी होत आहे.’’ अन्नपूर्णाकक्षाची जर अशी स्थिती असेल, तर लक्ष्मीदेवी किंवा अन्नपूर्णादेवी तेथे कसा बरे प्रवेश करील ?

४. आठवड्यातून एकदा अन्नपूर्णाकक्षाची स्वच्छता करावी !

आठवड्यातील एक दिवस अन्नपूर्णाकक्षाच्या स्वच्छतेला दिला पाहिजे, हेसुद्धा महिलांना शिकवावे लागते. हा लेख वाचून प्रत्येकाने आपल्या अन्नपूर्णाकक्षात जावे आणि मी सांगितलेल्या तथ्याची त्वरित प्रचीती घ्यावी !

५. अन्नपूर्णाकक्षातील स्पंदनांचा अभ्यास करा !

तुमच्या अन्नपूर्णाकक्षातील स्पंदने कशी आहेत ? याची प्रचीती घ्या. तेथे एका आसनावर बसून १५ मिनिटे नामजप करावा. जर तुमचे मन विचलित झाले, तर समजावे की, तेथील स्पंदने नकारात्मक आहेत. आता तर महानगरांमध्ये भाजीमंडईवरही संकट आल्यासारखे वाटत आहे. पुढे तर अन्नधान्य मिळणेही कठीण होईल. त्यामुळे आताच वेळ असतांना अन्नपूर्णाकक्षातील देवत्व जागृत करावे.

मी जी सूत्रे सांगितली आहेत, त्यांचा नियमितपणे सराव करावा. त्यामुळे केवळ तुमच्या घराचीच स्पंदनेच नव्हे, तर तुमच्या कुटुंबियांच्याही स्वभावात पालट दिसू लागतील.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३१.१.२०२२)