सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल सादर करण्यास २ दिवसांची मुदत

  • ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण

  • माहिती उघड केल्याने न्यायालय आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना हटवले !

  • नंदीसमोरील भिंत तोडणे आणि ढिगार्‍याचे सर्वेक्षण करणे यांवर आज सुनावणी होणार !

ज्ञानवापी मशिदीच्या कुंडामध्ये सापडलेले शिवलिंग

वाराणसी (उत्तप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर १७ मे या दिवशी त्याचा अहवाल न्यायालय आयुक्तांकडून सादर करण्यात येणार होता; मात्र न्यायालय आयुक्तांनी विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी आणखी २ दिवसांची मुदत देण्याची केलेली मागणी दिवाणी न्यायालयाने मान्य केली. तसेच या वेळी साहाय्यक न्यायालय आयुक्त विशाल सिंह यांनी ‘न्यायालय आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाचा आदेश असतांनाही सर्वेक्षणाविषयीची माहिती प्रसारमाध्यमांकडे उघड केली, तसेच पक्षपात केला’, असा आरोप केला. मिश्रा यांनी खासगी चित्रीकरण करणार्‍याकडून ही माहिती उघड करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयाने याची गंभीर नोंद घेत मिश्रा यांना न्यायालय आयुक्त पदावरून हटवण्याचा आदेश दिला. ‘मिश्रा यांचे वर्तन दायित्वशून्यतेचे आहे. लोकसेवक असतांना असे करणे अयोग्य होते’, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना फटकारले. तसेच आता साहाय्यक आयुक्त विशाल सिंह आणि अजय प्रताप सिंह यांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

(सौजन्य : CNN-News18)

न्यायालयात १६ मे या दिवशी ज्ञानवापी मशिदीच्या कुंडामध्ये शिवलिंग सापडल्याचे सांगत तो भाग बंद (सील) करण्यासह तेथे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आल्यानंतर १७ मे या दिवशी या शिवलिंग आणि नंदी यांच्या मध्ये असणारी भिंत तोडण्याची मागणी हिंदु पक्षाकडून करण्यात आली. तसेच मशीद परिसरात असलेला ढिगार्‍याचेही सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच येथे शिवलिंग सापडल्याच्या ठिकाणी पूजा करण्याचा अधिकार मिळावा, या मागण्यांवर आता उद्या, १८ मे या दिवशी सुनावणी करण्यात येणार आहे.

१. न्यायालय आयुक्त विशाल सिंह यांनी न्यायालयाला, ‘एकूण ३ दिवस सर्वेक्षण आणि चित्रीकरण झाले. एकूण ११ घंट्यांचे चित्रीकरण करण्यात आले, तसेच २५० छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर केला जाऊ शकतो; मात्र या सर्वांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी २ दिवस लागतील’, असे सांगत मुदत मागितली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

२. ज्ञानवापी मशिदीतील नमाजपठणापूर्वी मुसलमानांकडून हात-पाय धुण्याची जागा (वजू खाना) येथे सर्वेक्षणाच्या वेळी शिवलिंग सापडले आहे. त्याचे पूर्ण स्वरुप उघड होण्यासाठी येथे असलेली भिंत, तसेच शौचालय तोडण्याची मागणी हिंदु पक्षाकडून करण्यात आली.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

वजूखाना बंद करू शकता ! – सर्वोच्च न्यायालय

(नमाजाच्या आधी हात-पाय धुण्याच्या ठिकाणाला ‘वजूखाना’ असे म्हणतात.)

नवी देहली – मुसलमान पक्षाकडून ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालय १९ मे या दिवशी पुढील सुनावणी करणार आहे. या वेळी ज्ञानवापी परिसरात वजूखान्याच्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याने दिवाणी न्यायालयाने त्याला सील करण्याचा आदेश दिला आहे. यावर मुसलमान पक्षाने आक्षेप घेतला. ‘वजूखाना नसेल, तर नमाजपठण कसे करायचे ?’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता; मात्र न्यायालयाने हा आक्षेप फेटाळत हा परिसर बंद (सील) करणे योग्य असल्याचे सांगितले. तसेच ज्ञानवापीमध्ये चालू असलेल्या नमाजपठणाला रोखण्यात येऊ नये, असेही निर्देश दिले. तसेच या संदर्भातील मूळ खटला दिवाणी न्यायालयातच चालवण्याचे सांगितले. या प्रकरणी न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे.