ज्ञानवापी मशिदीमध्ये मिळालेल्या पुराव्यांमुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे ! – पू (अधिवक्ता) हरि शंकर जैन

डावीकडे पू (अधिवक्ता) हरिशंकर जैन

वाराणसी – ज्ञानवापी मशिदीमध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये जे काही पुरावे हाती लागले आहेत, त्यामुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे. याविषयी अधिक बोलण्याची न्यायालयाने अनुमती दिलेली नाही; परंतु या सर्वेक्षणातून ज्या काही गोष्टी आणि तथ्ये समोर आली, ती अतिशय उत्साहवर्धक आहेत, असे प्रतिपादन हिंदु पक्षाचे पू (अधिवक्ता) हरिशंकर जैन यांनी केले आहे.

ज्ञानवापी मशिदीमध्ये लागोपाठ २ दिवस सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणाविषयी ‘इंडिया टीव्ही’ या वृत्त वाहिनीवर झालेल्या चर्चेत पू (अधिवक्ता) हरिशंकर जैन बोलत होते. या वेळी ते म्हणाले, ‘‘याप्रकरणी आमचे एकूण ६ दावे आहेत. त्यांतील एक दावा शृंगारगौरी देवीच्या वतीने आहे. ज्यात ‘मंदिराचा संपूर्ण परिसर हिंदूंना सोपवण्यात यावा’, अशी मागणी करण्यात आली आहे. या दाव्यामध्ये आम्ही पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे, ही एक बाजू आहे. पुढे जाऊन सर्व दावे एकत्र केले जातील. ‘शृंगारगौरी विराजमान’ हा मुख्य दावा आहे. त्यात संपूर्ण परिसरावर हिंदूंचा अधिकार असल्याचे म्हटले असून नवीन मंदिर उभारण्याविषयीही यात नोंद करण्यात आली आहे. आता दिसत असलेल्या इमारतीला ‘मशीद’ म्हणता येत नाही; कारण त्याला मशिदीचे स्वरूपच नाही. खाली मंदिर आहे आणि वर एक ढाचा बांधण्यात आला आहे.’’