पाश्‍चिमात्य शक्तींनी चुकीचा इतिहास आमच्यावर लादला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यशासन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करून वाचनालयात वितरित करणार

‘इंडियन सिनेमा हेरिटेज फाऊंडेशन’ आणि गोवा मनोरंजन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे ‘कुमांव लिटररी’ या प्रवासी साहित्य महोत्सवाचे आयोजन

पणजी, १५ मे (वार्ता.) – पाश्‍चिमात्य शक्तींनी आमच्यावर चुकीचा इतिहास लादला. आमच्या इतिहासातील बहुतांश भाग हा पाश्‍चिमात्यांच्या प्रचाराचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या प्रकाराला आव्हान दिल्याने त्यांच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात खोटी माहिती प्रसारित करण्यात आली, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. ‘कुमांव लिटररी’ महोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

‘इंडियन सिनेमा हेरिटेज फाऊंडेशन’ आणि गोवा मनोरंजन सोसायटी यांनी संयुक्त विद्यमाने पणजी येथे ‘कुमांव लिटररी’ या प्रवासी साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे बोलतांना ‘पोर्तुगिजांचे राज्य असले, तरी गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘१८५७चे स्वातंत्र्य समर’ आणि विक्रम संपथ यांनी लिहिलेले पुस्तक यांचे तातडीने पुनर्मुद्रण करून ते वाचनालयात वितरित करणार असल्याची घोषणा केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘१८५७चे स्वातंत्र्य समर’ या पुस्तकामुळे अनेक युवकांमध्ये देशप्रेमाची ज्वाळा पेटू शकली आणि यामुळे ब्रिटिशांनी या पुस्तकावर बंदी घातली होती. सुदैवाने या पुस्तकाची एक प्रत एका गोमंतकियाकडे उपलब्ध असल्याने त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करता येणे शक्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली.