हिंदु विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची मागणी
मुंबई, १३ मे (वार्ता.) – मुंबईतील भायखळा येथील सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेतील सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना ‘मे २०२२ समर कँप’च्या नावाखाली बायबल शिकवले जात आहे. हा कँप सर्व धर्मियांसाठी असल्याचे शाळेच्या ठिकाणी लावलेल्या फलकावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या शाळेत येणारे बहुसंख्य विद्यार्थी हे हिंदु आहेत. त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याला डावलून केवळ बायबल शिकवणे, म्हणजे राज्यघटनेतील भा.दं.वि. कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकाला असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याला तडा देणे आहे. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ मे या दिवशी शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ‘या शाळेच्या व्यवस्थापकांना याविषयी समज द्यावी, तसेच धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा प्रकार त्वरित थांबवावा आणि शाळेतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांसाठी श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात यावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मुंबईत ख्रिस्ती कॉन्व्हेंट की धर्मांतर केंद्र !!@SiddhantMohite1@KaduAmol @noconversionhttps://t.co/EpL1fcgb31
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) May 13, 2022
हिंदु जनजागृती समितीने केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की,
१. सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेत ‘व्हेकेशन बायबल स्कूल’ या नावाने बायबल शिकवले जात आहे. ख्रिस्ती विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याविषयी आमचा कोणताही आक्षेप नाही; मात्र या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु आहेत. असे असतांना हिंदु विद्यार्थ्यांवर बायबलची सक्ती कशासाठी ?
२. सेंट अँड्र्यूज मराठी चर्चद्वारे चालवली जाणारी शाळा ही खासगी असली आणि चर्चकडून चालवली जात असली, तरी या शाळेत येणारे बहुसंख्य विद्यार्थी हिंदु आहेत. या सर्व विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेतले जाते; मात्र धार्मिक शिक्षण केवळ बायबलचे दिले जाते.
३. सरसकट सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याचा प्रकार आक्षेपार्ह आहे. याविषयी काही हिंदु विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीही आमच्याकडे आल्या आहेत.
…अन्यथा शाळेवर मोर्चा काढू !
हा प्रकार हिंदूंच्या धार्मिक आस्थेशी जोडलेला आहे. त्यामुळे या संदर्भात शिक्षण विभागाने तत्परतेने कृती करून आम्हाला अवगत करावे. याविषयी पालकवर्ग आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या भावना तीव्र आहेत. ‘यावर उचित कार्यवाही झाली नाही, तर पालकवर्ग आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना शाळेवर मोर्चा काढतील’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या तक्रारीत दिली आहे.
पालकवर्ग आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांची मागणी !
१. शाळेच्या वतीने घेण्यात येणारे ‘व्हेकेशन बायबल स्कूल’ हे सर्व धर्मियांसाठी असल्याचे म्हटले आहे. हे केवळ ख्रिस्ती विद्यार्थ्यांसाठीच घेण्यात यावेत.
२. शाळेतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवण्यासाठी शाळेला साहाय्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी आम्ही साहाय्य करण्यास सिद्ध आहोत.