केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर संतप्त काश्मिरी हिंदूंचा आरोप

उजवीकडे राहुल भट

जम्मू – जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून ठिकठिकाणी निर्देशने करत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. काश्मिरी हिंदूंंवर सातत्याने आक्रमणे केली जात असतांना केंद्र आणि राज्य सरकार त्यांना संरक्षण देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. ‘सुरक्षेची हमी न मिळाल्यास कामावर जाणार नाही’, असे हिंदूंनी स्पष्टपणे सांगितले. काश्मिरी हिंदूंनी बारामुल्ला-श्रीनगर महामार्ग आणि जम्मू-श्रीनगर महामार्ग रोखून धरत केंद्र सरकार अन् जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा येईपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नसल्याचे आंदोलक काश्मिरी हिंदूंनी स्पष्ट केले होते; मात्र प्रशासनाने समजूत घातल्यानंतर राहुल यांचा मृतदेह कह्यात घेण्यात आला. १३ मे या दिवशी राहुल यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्थानांतरासाठीच्या अर्जावर प्रशासनाने विचार केला नाही ! – राहुल यांच्या वडिलांचा आरोप

राहुल भट यांच्या वडिलांनी सांगितले की, राहुल गेल्या अनेक मासांपासून स्थानांतरासाठी अर्ज करत होता; मात्र जिल्हा प्रशासनाने त्याच्या अर्जावर विचार केला नाही. सरकारी कार्यालयातच हिंदू सुरक्षित नसतील, तर मग कुठे तरी असतील का ? काश्मिरी हिंदूंना संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

सूड उगवू शकत नसाल, तर हिंदुत्वाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे ? – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी 

राहुल भट यांच्या हत्येविषयी भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी, ‘ज्याप्रमाणे मोदी सरकार याकडे सहजतेने पहात आहे, तसे त्यांनी पहायला नको. जर सरकार घाबरट आणि सूड उगवू शकत नसेल, तर हिंदुत्वाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

‘मोदी केवळ जम्मूमध्येच का जातात ? त्यांनी श्रीनगरमध्येही जायला हवे, असेही त्यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

  • केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !