तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी, कुडाळ येथे जिज्ञासूंसाठी ‘साधना शिबिरा’चे आयोजन

साधना शिबिरात दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सौ. ज्योत्स्ना नारकर सद्गुरु सत्यवान कदम आणि सौ. माधुरी ढवण

कुडाळ (सिंधुदुर्ग) – भान हरपून सेवा करणे महत्त्वाचे असते. तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते. सध्याचा काळ हा संधीकाळ आहे. या संधीकाळाचा अनेक पटीने लाभ होतो. असा काळ शेकडो वर्षे परत येणार नसून या संधीकाळाचा लाभ करून घ्या, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी येथे आयोजित साधना शिबिरात केले.

कोरोनाच्या काळात सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ साधना सत्संग शृंखला चालू करण्यात आली होती. या सत्संग शृंखलेत सहभागी झालेल्या जिज्ञासूंना साधनेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील पिंगुळी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ५ मे या दिवशी साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रारंभ सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या वेळी सनातनच्या साधिका सौ. माधुरी ढवण आणि सौ. ज्योत्स्ना नारकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण तांडेल यांनी केले.

सद्गुरु सत्यवान कदम

या वेळी सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले की, येणार्‍या आपत्काळात जो देवाचा भक्त होईल, त्याचेच रक्षण भगवंत करणार आहे. आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व, अनिष्ट शक्तींच्या त्रासांची लक्षणे आणि उपाय यांविषयी माहिती दिली. या माहितीच्या अनुषंगाने करायच्या विविध आध्यात्मिक उपायांची प्रात्यक्षिके सौ. माधुरी ढवण यांनी करून दाखवली. या वेळी झालेल्या गटचर्चेत जिज्ञासूंनी विविध उपक्रम शिकून ते इतरांनाही शिकवण्याची सिद्धता दर्शवली.

शिबिरात साधना सत्संग घेणार्‍या साधकांनी केलेले मार्गदर्शन

सौ. ज्योत्स्ना नारकर – श्री गुरु हे तत्त्वरूपाने आपल्याला साधना सांगण्यासाठी प्रोत्साहन देऊन योग्य मार्ग दाखवत असतात. गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेसाठी सुवर्णसंधी आहे. गुरूंची कृपा ग्रहण करण्याचे माध्यम सत्सेवा आहे. गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने असलेल्या विविध प्रकारच्या सेवा झोकून देऊन करूया अन् श्री गुरूंची कृपा संपादन करून स्वत:चा उद्धार करून घेऊया.

श्री. हेमंत मणेरीकर – सेवा करतांना मनात नकारात्मक विचार आल्यास तो काढून सकारात्मकतेची जोड देऊया. सेवा करतांना दोषांवर एकदा मात करता आली की, सत्सेवेमध्ये काहीच अडचणी येत नाहीत. सेवेत मनाच्या स्तरावर येणारे अडथळे दूर करून गुणसंवर्धन होणे महत्त्वाचे आहे. ‘सेवा ही देवाचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवून केली, तर ती भावपूर्ण होईल.

‘ऑनलाईन’ सत्संग आणि शिबीर यांविषयी धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. दीपक कांबळी – यापूर्वी मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होतो; पण ते कार्य करत असतांना जो आनंद मिळाला नव्हता, तो आनंद सनातन संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे. ही संस्था निःस्वार्थपणे कार्य करत आहे. त्यामुळे या पुढे संस्था आणि धर्म यांसाठी शक्य तेवढे कार्य करायचे मी ठरवले आहे. कोरोनाच्या काळात सत्संगाचा लाभ मिळाल्याने घरात पुष्कळ आनंद मिळत आहे.

२. सौ. श्रृती माने – साधनेबरोबरच दोष घालवण्याचे महत्त्व या सत्संगांच्या माध्यमातून लक्षात आले. अनेक दोषांमध्ये पालट होत असल्यामुळे आनंद जाणवत आहे.

३. सौ. पूर्वा गावडे – साधना सत्संगांतून जे ज्ञान मिळाले ते विद्यार्थी, पालक आणि शेजारी यांना सांगण्याचा प्रयत्न केला. धर्मशिक्षण देणारी ही एकमेव संस्था आहे.

४. सौ. सुवर्णा मोंडकर – अडचणींवर मात करणे, आत्मपरीक्षण करून दोष घालवण्याचे महत्त्व समजले. यातून जीवनाला कलाटणी मिळाली.

५. सौ. श्रद्धा तांडेल – प्रत्येक शाळेत धर्मशिक्षण वर्ग झाले पाहिजेत. हिंदुत्वाची सर्व माहिती मुलांपर्यंत पोचली, तर भविष्यात अशी शिबिरे घ्यावी लागणार नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची आज खरोखरच आवश्यकता आहे.

६. प्रियांका सांगेलकर – मी साधनेला प्रारंभ केल्याने आमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या सत्संगामुळे आत्मबळ निर्माण झाले.

७. ज्योती चिंचळकर – आमच्या घरात सनातनचे अनेक ग्रंथ पूर्वीपासून आहेत. या ग्रंथांमध्ये पुष्कळ तेज आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा साधनेशी जोडले गेले. आपल्यातील दोष काढल्याविना इतर विषयांचा उपयोग शून्य असतो, हे या माध्यमातून समजले.

उपस्थित शिबिरार्थी

क्षणचित्रे

१. सौ. सुचेता वर्दे यांच्या घरात धार्मिक कार्यक्रम (विधी) होता. तो कार्यक्रम आटोपून त्या शिबिराला दुपारच्या सत्रास आवर्जून उपस्थित राहिल्या.

२. ऑनलाईन सत्संगात सहभागी असलेल्या जिज्ञासूंची शिबिराच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकमेकांशी प्रत्यक्ष भेट झाली. अनेकांनी सत्संगात बोललेल्या आवाजावरून एकमेकांना ओळखले.