देशाचे रक्षण करतांना आलेला मृत्यू, हा अभिमानाचा असतो ! – हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

पुणे – सेनादलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या ‘सुरक्षित’ भविष्याची निश्चिती मिळते. इतर नोकऱ्यांपेक्षा सैन्यदलात मिळणारे लाभ हे अधिक चांगले आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे देशसेवेची चांगली संधी मिळते; परंतु ‘सेनादलात भरती होणे म्हणजे जोखीम’ अशा अर्थाने याकडे पाहिले जात असल्याने अनेकांना सेनादलातून देशसेवा करता येत नाही. जोखीम ही प्रत्येक क्षेत्रात आहे. अगदी रस्त्याने जातांनाही मृत्यूची भीती आहे. अशा प्रकारे मरण्यापेक्षा देशाच्या सीमेवर, देशाचे रक्षण करतांना आलेला मृत्यू हा अभिमानाचा असतो, असे वक्तव्य (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘रक्षक मातृभूमीचे’ हा ‘सशस्त्र सेनादलातील करियरच्या संधी’ याविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम ‘एम्.पी.सी. न्यूज’ वृत्तसंकेतस्थळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने १० मे या दिवशी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधतांना हेमंत महाजन बोलत होते.

हेमंत महाजन पुढे म्हणाले की, सेनादलात काम करतांना प्रत्येक सैनिकासाठी देश हा सर्वप्रथम असतो आणि आपण स्वतः सर्वांत शेवटी असतो. स्वतःचा किंवा कुटुंबाचा असा संकुचित विचार न करता संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा विचार करून प्रत्येक सैनिक देशाच्या प्रत्येक भागात कार्यरत असतो. सैन्यदलात जाण्यासाठी अगम्य इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.

‘कीर्तीचक्र’ पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे, पॅरा कमांडो रघुनाथ सावंत यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला. सलग ६५ मिनिटे तलवारबाजी करून ‘इंडिया बूक’मध्ये नोंद झालेल्या शिवकन्यांचा त्यांच्या प्रशिक्षकांसह कार्यक्रमात सत्कार झाला.