सीमाप्रश्‍न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

नवी देहली – भारतीय सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहे. सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भक्कम स्थितीत आहे. सीमाप्रश्‍नाचे निराकरण हे मुख्य सूत्र आहे. सीमाप्रश्‍न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पहातो. एक देश म्हणून आपल्याला ‘संपूर्ण राष्ट्र’ असा दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती पालटण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखणे आणि त्यासाठी अशा प्रयत्नांचा प्रतिकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले आहे.

जनरल पांडे पुढे म्हणाले की, सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. तसेच एप्रिल २०२० पूर्वीची स्थिती पूर्ववत् करणे, हे भारतीय सैन्याचे उद्दिष्ट आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कामात चोख रहाण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

याचसमवेत भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक अन् सैनिकी चर्चेच्या परिणामी पँगाँग लेक, गोगरा आणि गलवान येथील पॅट्रोल सेंटर १४ च्या उत्तर अन् दक्षिण सीमेवरील सैन्य हटवण्यात आले आहे. उर्वरित क्षेत्रातही चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा आहे. दोन्ही बाजूंमध्ये विश्‍वास आणि शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे; परंतु ते एका बाजूने होऊ शकत नाही.