भंडारा – काही दिवसांपूर्वी येथील उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू तस्करांनी आक्रमण केले होते. त्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे नोंद घेतली आहे. येथील जिल्हाधिकारी संदीप कदम आणि पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी ४ मेच्या मध्यरात्री भंडारा तालुक्यातील वडेगाव रेतीघाटावर धडक कारवाई करत अनधिकृतपणे रेतीची वाहतूक करणारे तब्बल ११ ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी २ वाळू तस्करांना अटक करण्यात आली आहे. जयदेव बोरकर आणि महेंद्र हजारे अशी त्यांची नावे आहेत.
वरील २ तस्करांकडून इतर वाळू तस्करांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. त्यांच्यावरही आता कारवाई होऊ शकते. मध्यरात्री कारवाईसाठी अधिकारी आल्याचे पहाताच वाळू तस्करांनी वाहन सोडून पळ काढला. तहसीलदार अरविंद हिंगे यांनी मध्यरात्रीचा थरार सांगितला, तसेच ‘महसुलाची चोरी करणाऱ्यांना सोडणार नाही’, अशी चेतावणी दिली.
संपादकीय भूमिकाजिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी वारंवार रेती तस्करांवर अशी कारवाई केल्यासच रेतीची चोरी थांबेल ! |