दंगलीनंतर जोधपूरमध्ये संचारबंदी, ९७ जणांना अटक !

जोधपूर (राजस्थान) – राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा
ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत ९७ जणांना अटक करण्यात आली असून गेल्या २ दिवसांपासून शहरात संचारबंदी लागू आहे. एकूण १ सहस्र पोलीस तैनात करण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपवर आरोप करत म्हटले की, भाजपकडून हिंदू-मुसलमान यांच्यामध्ये दंगली घडवल्या जात आहेत. ध्रुवीकरणाच्या नावाखाली किती काळ राजकारण केले जाणार आहे ? हा देश सर्व धर्म अन् जाती यांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांना हे कळायला हवे.

दुसरीकडे भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावर बोट ठेवले आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, राजस्थान पोलीस राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत आहे.