बिअरच्या दुकानासह मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवरील बंदीचाही ठराव संमत !
कळवण (जिल्हा नाशिक) – जिल्ह्यातील सप्तशृंग गडावर महिलांसाठी आयोजित विशेष सभेत बिअरच्या दुकानाला अनुमती देण्यास महिलांनी तीव्र विरोध दर्शवला, तसेच अवैध मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवर बंदीचा ठराव संमत करत कारवाईची मागणी केली. या वेळी महिलांनी या स्वच्छ आणि सुंदर गडावर पावित्र्य राखण्याची शपथ घेतली. (प्रशासनाने असा प्रयत्न कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी करण्याचे धाडस दाखवले असते का ? – संपादक) येथे महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ३० एप्रिल या दिवशी महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस सरपंच रमेश पवार, उपसपंचा मनीषा गवळी, ग्रामपंचायत सदस्य आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा बंदोबस्त न झाल्यास धरणे आंदोलन करण्याची चेतावणीही या वेळी महिलांनी दिली.
गडाचे पावित्र्य नष्ट करणारे प्रस्ताव ग्रामपंचायत स्वीकारतेच कसे ? – रणरागिणींचा प्रशासनाला जाब
या प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासनाने विविध विषयांसमवेत एका अर्जदाराच्या बिअर दुकानासाठी अनुमतीचा विषय मांडला. (याचा अर्थ ‘गावात बिअरचे दुकान चालू व्हावे, अशी प्रशासनाचीच इच्छा आहे’, असा होत नाही का ? – संपादक) यावर उपस्थित सर्वच महिलांनी रणरागिणीचा अवतार धारण केला. ‘गडाचे पावित्र्य नष्ट करणारा आणि गरीब जनतेचे घर उद्ध्वस्त करणारा प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालय स्वीकारतेच कसे ?’, असा जाब विचारत महिलांनी बिअरच्या दुकानाच्या अनुमतीला विरोध केला.
संपादकीय भूमिका
|