मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !

विधीमंडळात विषय उपस्थित करणार्‍या शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन !

डावीकडून सतीश सोनार, आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि प्रसाद मानकर

मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) – शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-दुर्ग यांनी नावे न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने याविषयी डॉ. मनीषा कायंदे यांना निवेदन दिले होते. या विषयाचे गांभीर्य ओळखून डॉ. मनीषा कायंदे यांनी हा विषय विधीमंडळात उपस्थित केला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सतीश सोनार आणि श्री. प्रसाद मानकर यांनी डॉ. मनीषा कायंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. कायंदे यांना अभिनंदनपत्रही देण्यात आले. ‘अशा प्रकारे अन्यही कोणते विषय असल्यास अवश्य कळवा’, असे या वेळी डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले.

मद्यालये किंवा बार यांना देवता, राष्ट्रपुरुष किंवा गड-दुर्ग यांची नावे असल्यास ती पालटण्यासाठी गृहविभागाने ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. याविषयी शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. डॉ. मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे भविष्यात देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान रोखला जाणार आहे.