वैद्य (कै.) अनिल पानसे यांचे कार्य अलौकिक ! – केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

गुरुवर्य वैद्य (कै.) अनिल पानसे स्मृती गौरव ग्रंथाचे प्रकाशन

मडगाव – गुरुवर्य वैद्य (कै.) अनिल पानसे स्मृती गौरव ग्रंथाचे प्रकाशन करतांना खूप आनंद झाला. त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील अलौकिक कार्याची प्रचीती त्यांच्या शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीमुळे येते, असे उद्गार केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी आयुष राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी काढले.

गुरुवर्य वैद्य (कै.) अनिल पानसे स्मृती गौरव ग्रंथाचे प्रकाशन करतांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक (डावीकडून दुसरे) आणि इतर मान्यवर

तुडुंब भरलेल्या रवींद्र भवन, मडगाव येथील सभागृहात २५ एप्रिल या दिवशी पानसे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे निमंत्रक वैद्य आदित्य बर्वे, संपादकीय समितीमधील सदस्य वैद्य परीक्षित शेवडे आणि वैद्या (श्रीमती) दीपाली पानसे (वैद्य (कै.) अनिल पानसे यांच्या पत्नी) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ धन्वंतरिस्तवन आणि दीपप्रज्वलन करून झाला. वैद्य (कै.) पानसे यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफीत दाखवल्यानंतर सभागृहातील सर्वांचे डोळे पाणावले.

वैद्य पानसे यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे आयुर्वेदाचे विद्यार्थी घडवण्यात घालवले. अनेक जीर्ण आणि असाध्य रोगाने ग्रस्त सहस्रो रुग्णांना त्यांनी व्याधीमुक्त केले. त्यांची अपुरी स्वप्ने पूर्ण करायचे दायित्व सर्व आयुर्वेद वैद्यांचे आहे, असे वैद्य आदित्य बर्वे म्हणाले.

वैद्य परीक्षित शेवडे यांनी स्मृती गौरव ग्रंथाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘‘या ग्रंथात स्मृतीलेखासमवेत वैद्य (कै.) अनिल पानसे यांचे आयुर्वेदाविषयीचे लेख, रुग्णपत्रके (केस पेपर), औषधी आणि कल्प यांचे संकलन जसे आहे, तसेच विद्यार्थी अन् वैद्य यांना मार्गदर्शन करणारे साहित्य आहे. या ग्रंथासाठी १३ राज्यांतून १ सहस्र ४०० हून अधिक नोंदणी झाली असल्याने हा ‘डिजिटल’ स्वरूपातसुद्धा सिद्ध केला आहे.’’

कार्यक्रमात ग्रंथ बनवण्यासाठी कष्ट घेतलेल्या संपादकीय समितीमधील  सर्व सदस्यांचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सावनी दांडेकर यांनी केले, तर वैद्या सोनल सावंत यांनी आभार मानले .