‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘कॅपिकॉन’ या दोन दिवसांच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ. राहुल दिवाण (डावीकडून तिसरे), तसेच अन्य मान्यवर

कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) – वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवनवीन पालट आधुनिक वैद्यांनी आत्मसात् करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व ‘फिजिशियन’ यांना ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ (ए.पी.आय.) कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘कॅपिकॉन-२०२२’ या २ दिवसांच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी हॉटेल सयाजी येथे होईल, अशी माहिती ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. राहुल दिवाण यांनी २८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सचिव डॉ. अमोल खोत, डॉ. अक्षय बाफना, डॉ. गिरीश हिरेगौडर, डॉ. बुद्धीराज पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. अमोल खोत म्हणाले, ‘‘आम्ही ८ वर्षे अशा परिषदेचे आयोजन करत असून यासाठी ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने ४ गुण प्रदान केले आहेत. परिषदेमध्ये ३० एप्रिल या दिवशी दुपारी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरे सत्र घेण्यात येणार आहे, तसेच दोन दिवसांमध्ये विविध विषयांवर तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. या परिषदेसाठी ३०० हून अधिक चिकित्सक उपस्थित रहाणार आहेत.’’