कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) – शासनाकडून निधी संमत होऊनही बहुतांश कामे प्रलंबित असल्याचे दिसून येते. ४ मासांपूर्वीही ठेकेदारांना ‘वर्क ऑर्डर’ देऊनही कामास प्रारंभ केला जात नसेल, तर हे महापालिका प्रशासनाचे अपयश आहे. विकासकामे थांबल्याने त्याचा विपरित परिणाम शहराच्या विकासकामांवर होत आहे. तरी विकासकामांच्या संदर्भात ठेकेदारांची मनमानी खपवून घेऊ नका आणि काम करत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात संमत योजना, निधी, प्रस्तावित आराखडे, विकासकामे यांचा आढावा त्यांनी २८ एप्रिल या दिवशी महापालिकेत घेतला. तेव्हा या सूचना केल्या. या बैठकीस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.