जर्मनीचा फुटबॉलपटू मेसूत ओझिल याचे भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेविषयी प्रार्थना करण्याचे आवाहन

सामाजिक माध्यमांतून टीका

जर्मनीचा फुटबॉलपटू मेसूत ओझिल

नवी देहली – तुर्कस्तान वंशाचा जर्मनीचा फुटबॉलपटू मेसूत ओझिल याने भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेविषयी ट्वीट केल्याने सामाजिक माध्यमांतून त्याच्यावर टीका केली जात आहे. याआधी ओझिल यानेही चीनमधील मुसलमानांच्या परिस्थितीवर ट्वीट केले होते. मेसूत ओझिल ‘रिअल माद्रिद’ क्लबकडून फुटबॉल खेळतो.

१. ओझिलने ट्वीटमध्ये लिहिले, ‘लैलात अल्-कद्र’च्या (दृढ संकल्पाच्या) पवित्र रात्री भारतातील आमच्या मुसलमान बांधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करा. या लाजिरवाण्या परिस्थितीविषयी जागरूकता पसरवूया. जगातील तथाकथित सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात मानवाधिकारांचे काय होत आहे ?’

२. ओझिल याच्या या ट्वीटवर टीका करतांना अनेकांनी पाकिस्तानमधील काही व्हिडिओ ट्वीट करत लिहिले की, हे सर्व पाकिस्तानमध्ये घडत आहे. तुझा अपसमज झाला आहे.’ पाकिस्तानमध्ये मुसलमानच मुसलमानांवर अत्याचार करत आहेत, त्यावरून ही टीका करण्यात आली.

संपादकीय भूमिका

जगातील कुठल्याही इस्लामी देशांपेक्षा भारतातील मुसलमान भारतात अधिक सुरक्षित आणि सुखी आहेत; मात्र जाणीवपूर्वक ‘ते असुरक्षित आहे’ अशी अपकीर्ती करण्यात येत आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. याविषयी भारत सरकारने ओझिल आणि त्याचा देश जर्मनी यांना खडसावले पाहिजे !