संमेलन कि मनोरंजन ?

२२ एप्रिल या दिवशी (आज) ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…

‘मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे’, हा व्यापक हेतू साध्य होण्यासाठी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते; मात्र सध्या याचे स्वरूप अधिक प्रमाणात मनोरंजन, व्यावसायिक आणि राजकीय झालेले दिसते. २२ एप्रिल या दिवशी (आज) उद्गीर (जिल्हा लातूर) येथे मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथे केवळ साडेचार मासांपूर्वी झालेल्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनातील त्रुटी इतक्या अल्प कालावधीत विसरून चालणार नाहीत. ‘पंचतारांकित संमेलनाच्या नादात महामंडळाचा हेतू आणि धोरणे यांचा बळी दिला गेला’, अशा कठोर शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी नाशिक येथील संमेलनाच्या आयोजकांवर टीका केली होती.

वर्षा कुलकर्णी

संमेलनाच्या दोन दिवस आधीपासूनच गायक अजय-अतुल यांचा ‘संगीत रजनी’ कार्यक्रम, तर दुसऱ्या दिवशी ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातील कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी रीतसर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अजय-अतुल, अवधूत गुप्ते आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांच्या कलागुणांचे रसिकांनी वेळोवेळी कौतुक केलेले आहे; पण जेथे साहित्य आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा कसलाही संबंध नसतांना ‘केवळ प्रसिद्धीसाठी केलेले प्रयत्न’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ग्रंथप्रसाराला चालना मिळावी, तसेच त्यावर विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने न्यायमूर्ती रानडे यांनी वर्ष १८७८ मध्ये पुणे येथे पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवले होते, मग या मनोरंजनात्मक कार्यक्रमांतून संमेलनाचा उद्देश साध्य होणार आहे का ?

नाशिक येथील ९४ व्या ‘पंचतारांकित संमेलना’चा शिक्का उद्गीर येथील संमेलनातून मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. नाशिक येथील संमेलनासाठी ३ कोटी ४४ लाख २८ सहस्र ९३८ रुपये व्यय झाले, त्यातील १ लाख २२ सहस्र रुपये केवळ रांगोळीसाठी व्यय झाले आहेत, अशी महिती संमेलनाच्या ताळेबंदातून निदर्शनास आली आहे. ‘देश आर्थिक संकटात असतांना लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी आणि असा भपकेबाजपणा उद्गीर येथील संमेलनात होणे अपेक्षित नाही’, असेच सामान्य जनतेला वाटते.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर