खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

  • हिंदूंना धडा शिकवण्यासाठी करण्यात आले आक्रमण !

  • खंबातच्या बाहेरून आले होते धर्मांध !

  • अटक झाल्यास कायदेशीर साहाय्य करण्याचे दिले होते आश्‍वासन !

  • धर्मांधांकडून इतकी सिद्धता करण्यात आली असतांना पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना ही माहिती आधीच का मिळाली नाही ? गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना असा हलगर्जीपणा होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • याविषयी पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, डावे, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी गप्प का ? – संपादक

कर्णावती (गुजरात) – श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर राज्यातील आणंद जिल्ह्यातील खंबात येथे मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात करण्यात आलेल्या अन्वेषणातून या हिंसाचाराचा कट विदेशात रचल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. या हिंसाचारात एक हिंदू ठार झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

आणंद जिल्हा पोलीस अधीक्षक अजित राजिया यांनी सांगितले की,

१. हिंसाचार घडवण्यासाठी खंबात येथे बाहेरून माणसे बोलावण्यात आली होती. श्रीरामनवमीनिमित्त निघणार्‍या मिरवणुकीच्या आदल्या दिवशी हिंसाचार घडवण्याची सर्व सिद्धता करण्यात आली. दगड आणि घातक वस्तू आक्रमणकर्त्यांना पुरवण्यात आल्या.

२. प्रत्यक्ष हिंसाचार चालू झाल्यानंतर दंगलखोरांनी दगडफेक आणि जाळपोळ करण्याची इतरांनाही चिथावणी दिली.

३. या आक्रमणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवण्यात आला होता. विदेशात हा कट रचण्यात आला होता.

४. मौलवी मुस्तकीम, त्याचे दोन साथीदार मतीन आणि मोहसीन, तसेच रझाक अयूब, हुसेन हशमशा दीवाण हे या कटात सहभागी होते, असे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

५. ‘मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना दगडफेक आणि जाळपोळ करा’, अशी सूचना आरोपींना देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ही कृती केल्याचेही अन्वेषणातून उघड झाले.

६. ‘हिंसाचाराच्या आरोपाखाली पकडले गेलात, तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. तुम्हाला कायदेशीर साहाय्य पुरवू’, असेही आश्‍वासन आक्रमण करणार्‍यांना दिले गेले होते.

७. आरोपींचे भ्रमणभाष संच पडताळले असता त्यांतून हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदु समाजाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने आक्रमण करण्याचा कट रचला गेला होता.