मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांची आई सौ. भवानी प्रभु यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी प्रभु यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची पुढील गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. साधेपणा

सौ. भवानीताईचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. साधेपणा हाच तिचा अलंकार आहे जणू.

२. निर्मळता

सौ. भवानीताईचे मन अत्यंत निर्मळ आहे. ती आमच्याशी बोलतांना प्रांजळपणे बोलते. तिच्यातील निर्मळतेमुळे तिचे हास्य अत्यंत निखळ आणि निर्मळ जाणवते.

३. अहं अल्प असणे

कु. मधुरा भोसले
सौ. भवानी भरत प्रभु

सौ. भवानीताई बालसंतांची माता आहे; परंतु ती स्वत:ला निराळे किंवा श्रेष्ठ समजत नाही. तिचे वागणे अत्यंत नम्र आणि सहज असते. आपल्याला तिच्याशी संवाद साधायला किंवा जवळीक करण्यासाठी विशेष काहीच प्रयत्न करावे लागत नाही.

४. आंतरिक साधना चांगली चालू असणे

तिच्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ श्रद्धा आणि भाव आहे. त्यामुळे ‘तिची आंतरिक साधना चांगली चालू आहे’, असे जाणवते.

५. शिकण्याच्या स्थितीत असणे

सौ. भवानीताई सतत शिकण्याच्या स्थितीत असते. ती पू. भार्गवराम यांचे वागणे, बोलणे, खेळणे इत्यादी सर्व कृतींचे निरीक्षण करून ‘बालसंत कसे वावरतात ?’, याचे निरीक्षण करून त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे जेव्हा तिला संतांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा अर्थ उमजत नसेल, तेव्हा ती संतांना विचारून घेते. यातून तिची शिकण्याची वृत्ती जाणवते.

६. व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने, नियमितपणे आणि मनापासून करणे

सौ. भवानीताईमध्ये ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे ती व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने, नियमितपणे आणि मनापासून करते. तिचे प्रयत्न अल्प असून ते पुष्कळ प्रमाणात वाढवले पाहिजेत’, याची तिला सतत जाणीव असते.

७. जेव्हा सौ. भवानीताई पू. भार्गवराम यांच्या सोबत असते, तेव्हा श्रीकृष्णाचा सांभाळ करणाऱ्या यशोदामातेची तीव्रतेने आठवण येणे

ती पू. भार्गवराम यांचे पालन पोषण अत्यंत वात्सल्यभावाने करते. तिच्यामध्ये इतका वात्सल्यभाव आहे की, तो तिच्या डोळ्यांतून सहजरित्या व्यक्त होत असतो. ती जेव्हा पू. भार्गवरामांसोबत असते, तेव्हा श्रीकृष्णाचा सांभाळ करणाऱ्या यशोदामातेची तीव्रतेने आठवण येते. ज्याप्रमाणे बाळकृष्ण यशोदामातेसह लीला करण्यासाठी खट्याळपणे वागत असे किंवा खोड्या करत असे, त्याप्रमाणे पू. भार्गवराम त्यांच्या मातेसह लीला करत असतात. तेव्हा मनाचा समतोल ढळू न देता सौ. भवानीताई अत्यंत संयमाने पू. भार्गवराम यांना समजावत असते.’

कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्या कृपेने सौ. भवानीताईंची वरील गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२२)