संतांचा वाढदिवस ही साधकांसाठी पर्वणी आनंदाची । साधक डुंबले भावसागरात ही कृपा गुरूंची ।।
रामनाथी – सतत देवाच्या अनुसंधानात आणि भावस्थितीत असणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा ७४ वा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.
पू. होनपकाका आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधकांसाठी नामजप करतात. ४.४.२०२२ या दिवशी त्यांचा नामजप पूर्ण झाल्यावर नेहमीप्रमाणे सद्गुरूंचा श्लोक म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्या पूर्वीच सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे), सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाईआजोबा (वय ८० वर्षे), सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी (वय ७५ वर्षे) आणि सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी तेथे उपस्थित होते. त्यानंतर सनातनचे साधक श्री. अजित तावडे यांनी ‘आज पू. होनपकाकांचा वाढदिवस आहे’, असे सर्वांना सांगितले. उपस्थित संत आणि साधक या भावक्षणाची आतुरतेने वाट पहात होते.
पू. संदीप आळशी पू. काकांना म्हणाले, ‘‘पू. काका, तुम्ही आजारी असूनही आमच्यासाठी येथे येता आणि आमच्यासाठी नामजप करता. आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’’ त्या वेळी पू. काकांचा भाव जागृत झाला आणि ते म्हणाले, ‘‘गुरुच माझ्याकडून हे करवून घेतात.’’ त्यानंतर पू. संदीप आळशी यांनी ‘मी सर्व साधकांच्या वतीने तुम्हाला नमस्कार करतो’, असे म्हणून पू. काकांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला. त्या वेळी एका संतांचा दुसऱ्या संतांप्रतीचा भाव पाहून सर्व साधक भावविभोर झाले.
नंतर साधकांनी पू. काकांसाठी बनवलेले कृतज्ञतापत्र आणि प्रसाद उपस्थित सर्व संतांनी पू. काकांना दिला. सर्व संतांना ‘पू. काकांसाठी काय करू आणि काय नको ?’, असे झाले होते’, असे जाणवत होते. सर्व संतांचा एकमेकांप्रतीचा भाव आणि प्रेम पाहून उपस्थित साधकांचा कृतज्ञताभाव दाटून आला. त्यानंतर कृतज्ञतापत्रातील काव्याचे वाचन करण्यात आले. या वेळी पू. संदीप आळशी म्हणाले, ‘‘पू. काका, या कवितेत तुमच्या जीवनाचे सार आले आहे.’’ त्यानंतर पू. काकांची मुलगी सुश्री (कुमारी) दीपाली यांनी पू. काकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या एका काव्याचे वाचन करण्यात आले. त्या वेळी पू. संदीप आळशी म्हणाले, ‘‘या कवितेतून दीपालीने सर्व साधकांचे मनोगतच मांडले आहे.’’ ही दोन्ही काव्ये ऐकतांना उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली.
साधकांना मार्गदर्शन करण्याविषयी पू. काकांना प्रार्थना केल्यावर ते म्हणाले, ‘‘आपण सर्व साधक मोक्ष मिळवण्यासाठीच आश्रमात आलो आहोत आणि ‘गुरूंच्या कृपेने तो आपल्याला मिळणारच आहे’, अशी श्रद्धा ठेवा !’’
वाढदिवसाच्या कार्यक्रमात पू. काकांच्या डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते आणि त्यांचा तो भाव पाहून सर्व साधक भावसागरात डुंबत असल्याची अनुभूती घेत होते. एकूणच तेथील वातावरण भावमय झाले होते. साधकांची ही भावस्थिती दिवसभर टिकून असल्याचे साधकांनी नंतर अनुभवले.
वाढदिवसाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती
१. ‘पू. काकांच्या डोळ्यांतून वहाणारे भावाश्रू हे अश्रू नसून मोतीच आहेत’, असे मला जाणवले.’ – कु. मधुरा गोखले
२. ‘पू. काकांचा वाढदिवस असल्याचे कळल्यापासून आम्हाला आनंद जाणवत होता.’ – ग्रंथांच्या संदर्भात सेवा करणारे साधक
३. ‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले.’ – सौ. अरुणा अजित तावडे
४. पू. काकांवर कविता करतांना ‘आपल्याला ही सेवेची संधी मिळाली’, याबद्दल कृतज्ञता वाटून भरून येत होते.’ – श्री. अजित तावडे
|