‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ गुढीपाडव्यापासून प्रारंभ !

उत्सवाचे यंदाचे १८८ वे वर्ष

तासगाव (जिल्हा सांगली), ५ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ प्रारंभ झाला असून १३ एप्रिलअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष १८३५ मध्ये चालू झालेल्या उत्सवाचे यंदा १८८ वे वर्ष असून या उत्सवात प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता जनजागृती प्रभातफेरी, सकाळी ७ वाजता महापूजा, दुपारी १२.१५ वाजता महानैवेद्य, सायंकाळी ७.३० वाजता करुणाष्टके, सवाया, रामरक्षा असे नित्य कार्यक्रम होत आहेत. हे सर्व कार्यक्रम सिद्धेश्वर रस्ता येथील श्रीराम मंदिरात होत आहेत.

श्री रामदेव तासगाव येथील रामोत्सवाची मिरवणूक

प्रतिदिन ९ एप्रिलअखेर रात्री ९.३० वाजता कीर्तन होईल, तसेच दुपारी भजन, सायंकाळी ६ ते रात्री ७ प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. १० एप्रिल म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी सकाळी १० ते १२.३० या वेळेत श्रींचा जन्मकाळ होणार असून ११ एप्रिल या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महाप्रसाद होणार आहे. १२ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ ते ७ वसंतपूजा आणि भावभक्तीगीत कार्यक्रम, तर १३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता लळीत आणि गोपाळकाला कीर्तन होईल. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री रामदेव मंदिराच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत फेरी काढण्यात आली.

गेल्या ४५ वर्षांपासून अधिक काळ चालू असलेली प्रभातफेरी !

गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ उत्सव काळात प्रभातफेरी काढण्यात येते. ही प्रभातफेरी प्रतिदिन सकाळी ६ ते ७ या वेळेत तासगाव शहरातील विविध भागांतून काढण्यात येते. यात सर्व प्रकारे धान्य अर्पण घेण्यात येते. ते प्रामुख्याने उत्सव समाप्तीच्या काळात होणाऱ्या महाप्रसादासाठी वापरण्यात येते.