देशातील अनेक समस्यांवर एकच उपाय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

खरवते (तालुका चिपळूण) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री. संजय जोशी

चिपळूण, २ एप्रिल (वार्ता.) – आज अनेक विदेशी ‘हिंदु धर्म’ जाणून घेण्यासाठी भारतात येतात. गंगातीरी आश्रमात रहातात. हिंदु संस्कृतीनुसार आचरण करतात आणि आनंद घेतात; मात्र भारतात स्वातंत्र्यानंतर मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीत पालट न केल्याने हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व हिंदूंच्याच लक्षात येत नाही. त्यामुळे आज पाश्‍चात्त्य संस्कृती नव्हे, तर विकृती घराघरांत शिरली आहे. वाढदिवस, नमस्कार करणे, तसेच उद्घाटन पाश्‍चात्त्य पद्धतीने केले जाते. महाविद्यालयांत विदेशी ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ साजरे केले जातात. कोरोना महामारीनंतर इस्रायलसारख्या अनेक देशात हस्तांदोलन (शेकहँड) न करता भारतीय संस्कृतीनुसार ‘नमस्कार’ करण्यास प्रारंभ केला आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आज देशाची वाताहत झाली आहे. देशात लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लोकसंख्येचा विस्फोट, गडकोट दुरवस्था अशा अनेक समस्या वाढत आहेत. या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच एकमात्र उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केले. तालुक्यातील खरवते येथील वरचीवाडी समाज मंदिरात आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी श्री. संजय जोशी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गाची माहिती देऊन उपस्थितांना धर्मशिक्षणवर्गाला येण्याचे आणि ईश्‍वरी कृपा संपादन करण्याचे आवाहन केले. तालुक्यातील पातेपिलवली येथील दत्त उपासक श्री. संतोष महाराज वनगे; खरवते येथील श्री. श्रीराम घाग, श्री. सुरेश घाग आणि ओमळी येथील श्री. अनंत पवार हे या सभेला उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन कु. सायली घाडे यांनी केले आणि समितीच्या कार्याविषयी श्री. महेश लाड यांनी माहिती दिली.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित धर्माभिमानी

मनोगत

१. ह.भ.प. सदानंद घाग महाराज, खरवते, ता. चिपळूण : ईश्‍वरनिर्मित धर्म टिकवणे आपले आद्य कर्तव्य आहे. हिंदु जनजागृती समिती अथक प्रयत्न करत आहे. समितीच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे.

अभिप्राय

१. श्री. अनंत पवार, अध्यक्ष, ज्ञानदीप वाचनालय, ओमळी : समिती धर्मजागृतीचे मोठे कार्य करत आहे.

२. श्री. दिलीप मोहिरे, श्री संप्रदाय, सावर्डे : धर्मजागृतीसाठी, हिंदूसंघटनासाठी उंबरठे झिजवायला हवेत. आपण धर्मासाठी थोडा वेळ तरी काढायला हवा.

३. श्री. अनंत श्रीराम घाग, खरवते, वरचीवाडी, चिपळूण : हिंदूंनी एकत्र यायला हवे नाहीतर हिंदूंचा टिकाव लागणार नाही. सभेच्या माध्यमातून धर्माची जोपासना कशी करावी ? ते समजले.

४. श्री. प्रशांत परब, श्री सुरेश कांबळी, कापसाळ : धर्मरक्षणासाठी आपण स्वत:च्या मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे.

५. श्री. सुरेश घाग, उपाध्यक्ष, खरवते, वरची वाडी प्रगती मंडळ, मुंबई : हिंदु जनजागृती समिती राष्ट्र-धर्माचे मोठे कार्य करत आहे. इथे मानधन मिळत नाही; मात्र समाधान मिळते, हे लक्षात आले.

६. श्री. मंगेश साठे, वहाळ : हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी, हिंदू संघटित होण्यासाठी अशा सभा होणे आवश्यक आहे.

७. श्री. उमेश यादव, खरवते : धर्मासाठी यथाशक्ती वेळ देणार. धर्मकार्यात सहभाग घेणार.