श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे झालेले हिंसक आंदोलन

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने स्थानिकांनी ३१ मार्चच्या रात्री राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘राष्ट्रपतींनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.

आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यावर हिंसा चालू झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुरासमवेतच पाण्याचा मारा करून आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. लोकांनी एका बसलाही आग लावली. राष्ट्रपतींच्या घरासमोर हा सर्व गोंधळ चालू असतांना ते स्वत: मात्र घरी नव्हते. या वेळी आंदोलनकांना रोखण्यासाठी विशेष कृती दल आणि अर्धसैनिक दल यांचा वापर करण्यात आला.