(म्हणे) ‘नागालँडमध्ये चर्चमुळे नागा समाजाचा ‘विकास’ झाल्याचा आनंद !’ – व्हॅटिकन

  • राज्यात चर्चचे कार्य वाढत असल्याचे व्हॅटिकन सिटीचे दूत आर्चबिशप लियोपोल्डो गिरेली यांचे विधान !

  • ख्रिस्ती समाजाने गरीब मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी केलेल्या कार्याचे केले कौतुक !

ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते. त्यामुळे सरकारनेही ख्रिस्त्यांच्या या सामाजिक कार्यातून साधलेल्या ‘विकासा’ची चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, ही अपेक्षा ! – संपादक

आर्चबिशप लियोपोल्डो गिरेली

कोहिमा (नागालँड) – ‘व्हॅटिकन सिटी’चे दूत आणि भारत अन् नेपाळ देशांसाठीचे पोप फ्रान्सिस यांचे राजनैतिक प्रतिनिधी आर्चबिशप लियोपोल्डो गिरेली हे नागालँडच्या ४ दिवसीय दौर्‍यावर होते. ‘इस्ट मोजो’ या पूर्वोत्तर भारतातील प्रसिद्ध वृत्तसंकेतस्थळाने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार २७ मार्च या दिवशी त्यांनी येथील एका चर्चमध्ये झालेल्या कार्यक्रमात येथील ख्रिस्ती समाजाने गरीब मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. या वेळी गिरेली यांनी ‘राज्यात चर्चचे कार्य वाढत असून त्या माध्यमातून नागा लोकांचा ‘विकास’ होत असल्या’विषयी आनंद व्यक्त केला.

नागालँडमध्ये आतापर्यंत ६२ सहस्र नागा लोकांनी स्वीकारला ख्रिस्ती धर्म ! – बिशप डॉ. जेम्स थोपिल

पूर्वोत्तर भारतातील स्थिती पाहून राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

बिशप डॉ. जेम्स थोपिल

या प्रसंगी कोहिमातील बिशप डॉ. जेम्स थोपिल म्हणाले की, ७० वर्षांपूर्वी राज्यात एकही कॅथॉलिक व्यक्ती नव्हती. आज नागा जातींतील लोकांपैकी ६२ सहस्र लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. यांमध्ये २०० नन आणि ६० पाद्री आहेत. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये येथे चर्चचा अत्याधिक प्रभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘कॅथॉलिक असोसिएशन ऑफ नागालँड’चे अध्यक्ष जॉनी रुआंगमेई म्हणाले की, कॅथॉलिक समुदाय नागालँडमध्ये दुसरा सर्वांत मोठा समुदाय आहे.