पाकचा भारतद्वेष मोडून काढून त्याला नामशेष करण्यासाठी भारताने आता कठोर पावले उचलावीत !
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची संकटात सापडली असून आता ते पायउतार होण्याची केवळ औपचारिकता शेष आहे. विरोधी पक्षांनी खान यांच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव मांडला असून त्यावर आज ३१ मार्च या दिवशी पाकच्या संसदेत मतदान होणार आहे. इम्रान खान यांना जर सत्तेतून पायउतार व्हावे लागले, तर त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू न शकणाऱ्या त्यांच्या देशातील पंतप्रधानांच्या लांबलचक सूचीत समावेश होईल. एकेकाळी आय.एस्.आय.चे ‘आवडते’ असलेल्या इम्रान खान यांच्या कारकीर्दीला अचानक अशी उतरती कळा कशी लागली ?, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
‘पाकिस्तानमध्ये लोकशाही आहे’, असे वरकरणी दिसत असले, तरी प्रत्यक्षात तेथे ‘लष्करशाही’च अस्तित्वात होती आणि आहे. पाकचे सैन्य आणि आय.एस्.आय. ही गुप्तचर संघटना यांना जी व्यक्ती ‘उपयुक्त’ वाटते, तिलाच पंतप्रधानपदी बसवले जाते. याद्वारे सत्तेचा ‘रिमोट’ स्वतःकडे राहील, याची पुरेपूर काळजी सैन्याकडून घेतली जाते. या ‘उपयुक्त’ व्यक्तीचे निकष काय असतात ?, तर ती कट्टर भारतद्वेषी असली पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे तिने सैन्य आणि आय.एस्.आय. यांचे बुजगावणे म्हणून काम केले पाहिजे. अशा व्यक्तीने थोडा जरी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तरी तिची उचलबांगडी ठरलेली असते. इम्रान खान यांचे तेच झाले. सध्या खान यांच्यावर भ्रष्टाचार, महागाई आणि आर्थिक गैरव्यवस्थापन असे अपयशाचे शिक्के मारले जात असले, तरी ते वरवरचे आहेत. सध्या सरकारवर जे बालंट आले आहे, त्यामागील खरे कारण सैन्य विरुद्ध इम्रान खान यांच्यातील वादात आहे. मागील वर्षी पाकच्या सैन्याचे हुकूमशहा जनरल कमर जावेद बाजवा यांनी फैज हमीद यांची आय.एस्.आय.च्या महासंचालकपदावरून उचलबांगडी करून त्या जागी लेफ्टनंट जनरल नदीम अंजूम यांची वर्णी लावण्याचा प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पाठवला होता. खान यांनी तो धुडकावून लावला; कारण आय.एस्.आय.च्या याच फैज हमीद यांनी इम्रान खान यांना सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इम्रान खान यांच्या या भूमिकेमुळे सैन्याने स्वतःचा ‘रिमोट’ वापरला आहे. यावरून हेही सिद्ध होते की, पाकच्या पंतप्रधानपदावरील व्यक्ती कोण असावी, हे सैन्य आणि आय.एस्.आय. ठरवते अन् त्यांना जेव्हा ती व्यक्ती डोईजड होते, तेव्हा तिला बाजूला फेकले जाते. आतापर्यंत सैन्याचा आदेश न मानणाऱ्या सर्वाधिक पंतप्रधानांची हकालपट्टी होण्याचा विक्रम जगात केवळ पाकच्या नावावर आहे.
पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उचलबांगडीचे मूळही अशा प्रकारच्या वादात होते. त्या वेळी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांची राजवट उलथवून लावत सत्तेची सूत्रे स्वतःकडे घेतली. पुढे जेव्हा मुशर्रफ डोईजड होऊ लागले, तेव्हा त्यांच्याच सैन्याने त्यांचीही राजवट उलथवून लावली. यासह याच सैन्याने भ्रष्टाचाराचे निमित्त करून नवाझ शरीफ यांचा राजकीय संन्यासही घडवून आणला. थोडक्यात जे जे पंतप्रधान सैन्याचे वर्चस्व झुगारतात, त्या सर्वांना सत्ताच्युत केले जाते, ही पाकच्या राजकीय पक्षांची व्यथा आहे. याला लोकशाही म्हणता येईल का ? लोकशाही राज्यपद्धतीत जनता ज्या पक्षाच्या बाजूने असते, त्याचा विजय निश्चित मानला जातो. पाकमध्ये मात्र ज्या पक्षाच्या मागे सैन्य उभे आहे, त्याचा विजय निश्चित मानला जातो आणि तरीही तिला ‘लोकशाही’ म्हटले जाते, हे विशेष ! म्हणूनच ही लोकशाहीच्या आडून पाकच्या सैन्याने चालवलेली हुकूमशाही आहे, हेच स्पष्ट होते. पाकच्या कुठल्याही पंतप्रधानाने स्वतःचे मत व्यक्त करणे, म्हणजे शेतातील बुजगावण्याने ‘मी माणूस आहे’, असे म्हणण्यासारखे आहे. मग सैन्याकडून अशांच्या, म्हणजे बुजगावण्यांच्या राजवटीचा अस्त ठरलेला असतो. पाकचे पंतप्रधानपद म्हणजे आगीवरून चालण्याचा प्रकार आहे. एकीकडून सैन्य आणि आय.एस्.आय. यांचा दबाव, दुसरीकडून अमेरिकेचा दबाव, चीनची दादागिरी, भ्रष्टाचार, आर्थिक डबघाई, कर्जबाजारीपणा अशा सर्व बाजूंनी या देशाचा पंतप्रधान घेरलेला असतो. त्यात त्याला स्वतःला निर्णय घेण्याची मोकळीकही नसते. त्यामुळे त्याची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’, अशी असते.
इतिहासाची पुनरावृत्ती !
वर्ष २०१७ आणि २०१८ मध्ये इम्रान खान यांनी पाकमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या विरोधात अनेक मोठमोठी आंदोलने केली होती. त्यांच्या सभांना लाखोंची उपस्थिती असायची. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना खुर्ची गमवावी लागली आणि इम्रान खान त्या खुर्चीवर स्वार झाले. आज याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. आज असाच जनक्षोभ इम्रान खान यांच्या विरोधात पहायला मिळत आहे. विरोधकांचे मोर्च्यांमागून मोर्चे निघत असून खान यांना खुर्ची सोडावी लागणार आहे. त्यामुळे खान यांची तशीच अवस्था झाली आहे, जशी त्यांनी त्यांच्या तत्कालीन सरकारची केली होती. आता ३१ मार्च या दिवशी खान यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. एकूण ३४२ सदस्य असलेल्या पाकच्या संसदेत १७२ हा बहुमताचा आकडा सत्तेसाठी आवश्यक आहे. इम्रान खान यांच्या आघाडी सरकारकडे १७८, तर विरोधकांकडे १६३ सदस्यसंख्या होती. आता चित्र पालटले असून आघाडी सरकारकडे १५५, तर विरोधकांकडे त्याहून अधिक सदस्यसंख्या आहे. त्यामुळे अशात खान यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. आज इम्रान खान यांच्या विरोधात दंड थोपटणारे नवाझ शरीफ यांचे भाऊ तथा ‘पीएम्एल-एन्’ या पक्षाचे नेते शाहबाझ शरीफ हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत; परंतु ते किंवा जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !