हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील सूत्रे कृतीत आणून व्यष्टी साधनेचा पाया पक्का करून झोकून देऊन धर्मकार्य करण्याचा निर्धार !

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप !

समारोपीय सत्रात मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (मध्यभागी), श्री. किरण दुसे (डावीकडे) आणि श्री. मनोज खाडये

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर), २९ मार्च (वार्ता.) – २६ आणि २७ मार्च या दिवशी ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’त जी सूत्रे शिकायला मिळाली, ती सूत्रे कृतीत आणून व्यष्टी साधनेचा पाया पक्का करून झोकून देऊन धर्मकार्य करण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी व्यक्त केला. येथील महात्मा गांधी तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालयात दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना धर्मप्रेमींना हा निर्धार व्यक्त केला. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची प्रतिज्ञा सर्वांकडून करवून घेण्यात आली.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची प्रतिज्ञा सांगतांना श्री. मनोज खाडये (उजवीकडे)

या कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याविषयी तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांचे, तसेच अल्पाहार आणि भोजन व्यवस्थेविषयी महाविद्यालयातील ‘मेस’चालक श्री. संजय मिसाळ यांचे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी आभार व्यक्त केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची प्रतिज्ञा करतांना धर्मप्रेमी

काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले वैशिष्ट्यपूर्ण मनोगत

१. श्री. विवेक स्वामी, कोल्हापूर – या कार्यशाळेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र संघटकासाठी आचारसंहिता महत्त्वाची असून त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे, हे मनावर बिंबले. येथे आल्यापासून स्वागत, शिस्त, आदर यांसह अन्य कुठेही मिळणार नाही, असा प्रेमभाव मिळाला. येथे ज्या कायदेशीर गोष्टींचे मार्गदर्शन झाले, त्याचा लाभ धर्मकार्य करतांना निश्चित होईल.

२. श्री. महंतेश देसाई, चंदगड, कोल्हापूर – साधना केल्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांच्या तोंडावळ्यावर तेज जाणवत असून आपणही साधना केली पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवले. मंदिरात जसे चैतन्य जाणवते तसे चैतन्य कार्यशाळेत जाणवत होते. हिंदु धर्म, संस्कृती याविषयी सखोल ज्ञान येथे मिळाले. प्रत्येक मासात अशी कार्यशाळा व्हावी.

समारोपीय सत्रात मनोगत व्यक्त करतांना सनातनची बालिसाधिका कु. राजेश्वरी जोशी (उजवीकडे)

समारोपीय सत्रात सनातनची बालसाधिका कु. राजेश्वरी जोशी (वय १० वर्षे) हिने  वैशिष्ट्यपूर्ण मनोगत व्यक्त केले. ‘मी रहात असलेल्या इमारतीतील मुलांकडून नामजप करवून घेते. शाळेतील मैत्रिणींना धर्माचरणाचे महत्त्व सांगते. विविध सण-उत्सवांना त्याची माहिती देणारी हस्तपत्रके वितरित करते. आईला सामाजिक माध्यमांद्वारे केल्या जाणार्‍या सेवेत साहाय्य करते, तसेच शाळेत उत्पादनांविषयी माहिती देते’, असे कु. राजेश्वरी हिने सांगितले.

कार्यशाळेतील काही धर्मप्रेमींचे मनोगत

१. श्री. विजय पाटील, सांगली – माझ्यातील दोष कृतीच्या स्तरावर कसे दूर करता येतील ? ते लक्षात आले. ईश्वरावर श्रद्धा ठेवून कृती केल्यास अडचणी दूर होतात, हे अनुभवले.
२. श्री. संतोष कुंभार, कोल्हापूर – हिंदु जनजागृती समिती देत असलेल्या धर्मशिक्षणामुळे आता कुणीही हिंदु धर्माविषयी प्रश्न विचारल्यास निर्भिडपणे उत्तर देऊ शकतो. मी आणि माझी पत्नी या धर्मकार्यात असून गावातील व्यापार्‍यांना एकत्र करून ‘हलाल’विषयी जागृती केली.
३. श्री. दीपक मोहिते, सांगली – साधनेसाठी आपण जरी पूर्णवेळ दिला, तरी व्यावहारिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही, हे लक्षात आले. माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला धर्माची माहिती देईन.
४. श्री. शिवदास माने, कोल्हापूर – येथील स्वच्छता, शिस्त, प्रेमभाव यांतून पुष्कळ शिकायला मिळाले. येथे जर इतका आनंद असेल, तर प्रत्यक्षात हिंदु राष्ट्रात किती आनंद असेल ? याची एक छोटीशी झलक पहायला मिळाली.
५. श्री. शिवराज तलवार, सातारा – आपण संघटनाभेद बाजूला ठेवून धर्मकार्यासाठी एकत्र आले पाहिजे. ‘प्रत्येकाला भेटल्यावर परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांना भेटत आहे’, असे वाटत होते.
६. डॉ. प्रद्युम्न निट्टूरकर, लातूर (महात्मा गांधी तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालयातील विद्यार्थी) – या कार्यशाळेमुळे मला लौकीक शिक्षणासमवेत हिंदु धर्मशिक्षणही मिळाले. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया समजली. त्याचा लाभ करून घेऊन तशी कृती पुढे करेन.
७. प्राध्यापक डॉ. सूर्यकांत मेटकरी, महात्मा गांधी तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालय – हिंदु जनजागृती समिती म्हणजे भारतात हिंदु धर्माचे कार्य करणारी एकमेव संघटना होय !

दोन दिवसीय सत्रात झालेले अन्य विषय आणि प्रबोधन

श्री. मनोज खाडये

१. विशाळगडाची दुरवस्था, तेथील वीरांच्या समाध्या, मंदिरे यांची दुरवस्था या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने उभा केलेला लढा, त्याची सद्यस्थिती याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी माहिती दिली. श्री. मनोज खाडये यांनी महापूर, तसेच अन्य विविध आलेल्या आपत्तींमध्ये हिंदु जनजागृती समितीवर लोकांचा विश्वास कशाप्रकारे आहे ? याविषयी सविस्तर माहिती दिली. श्री. किरण दुसे यांनी हिंदु जनजागृती समितीने काश्मीर विषयाच्या संदर्भात केलेली जनजागृती याविषयी माहिती दिली.

धर्मप्रेमींना ‘प्रार्थना’ विषयाची माहिती देतांना सौ. कल्पना थोरात (मध्यभागी)

२. दैनिक ‘सनातन प्रभात’ची गुणवैशिष्ट्ये सौ. राजश्री तिवारी आणि श्री. मनोज खाडये यांनी सांगितली. या वेळी धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ हे ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे नियतकालिक आहे. यातून धर्म, परंपरा, सण, उत्सव या संदर्भातील ज्ञान मिळते’, असे सांगितले.

३. विविध धर्मप्रेमींना विषय देऊन त्यांना व्यासपिठावर येऊन ते मांडण्यास सांगितले होते. अनेक धर्मप्रेमींनी ते अभ्यासपूर्ण मांडले. धर्मप्रेमी श्री. मंदार पाटुकले यांनी परसरगड येथील गडावर धर्मांधांनी कशाप्रकारे आक्रमण केले आहे ? आणि त्यांनी ते कशाप्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला ? याविषयी सांगितले.

‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा कसा द्यावा’ याविषयी मार्गदर्शन करतांना सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर (उजवीकडे), सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (मध्यमागी) आणि श्री. प्रसाद कुलकर्णी (डावीकडे)

४. ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा कसा द्यावा ?’ याविषयी सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये आणि सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले.

‘मी धर्माचा सेवक आहे, मला धर्म वाचवायचा आहे’, या भावनेने कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये

सर्व प्रसिद्धीमाध्यमांमध्ये युक्रेन-रशिया युद्धाचा सविस्तर वृत्तांत दाखवण्यात येत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमे बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड अगदी नगण्य प्रमाणात दाखवत आहेत. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात २३ सहस्र हिंदु युवती गायब आहेत. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जे घडले, ते केरळ आणि अन्यत्र होण्यास वेळ लागणार नाही. तरी हिंदूंनी जागृत राहून ‘मी धर्माचा सेवक आहे, मला धर्म वाचवायचा आहे’, या भावनेने कार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या नवे-पारगाव येथे आयोजित दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.

विशेष

१. काही धर्मप्रेमींनी ‘आम्ही अर्धा घंटाही एके ठिकाणी बसू शकत नाही; मात्र कार्यशाळेच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर आम्ही बसू शकतो हीच आमच्यासाठी अनुभूती आहे’, असे सांगितले.

२. अनेक धर्मप्रेमींनी ‘कार्यशाळेच्या माध्यमातून एक कुटुंब भावना निर्माण झाली’, असे सांगितले. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील धर्मप्रेमींनी अन्य जिल्ह्यांतील धर्मप्रेमींची ओळख करून घेऊन एकत्रित धर्मकार्य करण्याचा निश्चय केला.