हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

  • ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक
  • ज्याप्रमाणे हिंदु नेत्यांना भाषणानंतर काही वेळा त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली जाते, त्याप्रमाणे अशा मौलवींवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक

(मौलवी म्हणजे इस्लाममधील धार्मिक नेते)

राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथील जामा मशिदीचा मौलवी फारूख याने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये भाषण करतांना हिंदूंना नष्ट करण्याचे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमायाचना केली आहे. मौलानाच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याच्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर त्याने क्षमा मागितली. ‘मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर सरकारच्या विरोधात बोललो होतो’, असे स्पष्टीकरण त्याने दिले. मौलवीने त्याच्या भाषणात या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली होती.

आम्ही या देशावर ८०० वर्षे राज्य केले, तर त्यांनी (हिंदूंनी) ७० वर्षे राज्य केले; मात्र ते आम्हाला नष्ट करू शकत नाहीत !

काय म्हणाला होता मौलवी फारूख ?

मौलाना फारूख याने म्हटले होते की, गेल्या ३२ वर्षांत अगणित मुसलमान ठार झाले; मात्र त्याविषयी कुणीही उल्लेख करत नाही. लोक काश्मिरी मुसलमानांचे दुःख विसरले आहेत. त्यांचे रक्त कुणालाच दिसत नाही. आम्ही शांततेची आवड असणारे लोक आहोत. आम्ही या देशावर ८०० वर्षांपर्यंत राज्य केले आहे, तर या लोकांनी (हिंदूंनी) ७० वर्षे राज्य केले आहे; मात्र आमची ओळख ते नष्ट करू शकत नाहीत. तुम्ही नष्ट व्हाल; पण आम्ही नाही.’ या भाषणाच्या वेळी बसलेले लोक ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देतांना दिसत आहेत.

मौलवीच्या या व्हिडिओवर ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करतांना म्हटले की, याच प्रकारे काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला होता.