३१ मार्चपर्यंत संप मागे घेतल्यास कारवाई करण्यात येणार नाही !

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाविषयी परिवहनमंत्री अनिल परब यांचे आवाहन !

परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. गुढीपाडव्यापूर्वी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा. ३१ मार्चपर्यंत कामाला येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी २५ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

 

या वेळी अनिल परब म्हणाले, ‘‘एस्.टी. कर्मचार्‍यांना आर्थिक वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारवर ४ सहस्र ३२० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, यासाठी मी ७ वेळा आवाहन केले आहे. एस्.टी.च्या संपामुळे ४८ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. १९ अपघात झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. कोणत्याही कर्मचार्‍याने आत्महत्या करू नये. आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीय उघड्यावर येते. ज्या अन्य मागण्या आहेत, त्याविषयी कर्मचारी कामावर आल्यावरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.’’