रामवाडी (पुणे) येथील नदीपात्रातील आरोग्याला धोकादायक असणारी जलपर्णी काढण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – येथील साईनाथनगर (रामवाडी) वडगावशेरी नदीपात्रामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करत नदीतील जलपर्णी काढावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत. या जलपर्णीमुळे परिसरातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले सातत्याने आजारी पडत आहेत. परिसरात महापालिकेकडून स्वच्छतेवर भर दिला असतांना येथील नागरिकांच्या आरोग्य समस्येकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मल:निस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता शरद मरकड म्हणाले, ‘‘मुंढवा, खराडी, वडगावशेरी या भागांतील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे. येत्या ८ दिवसांमध्ये ते पूर्ण होईल.’’