जेव्हा रशियाला स्वतःच्या अस्तित्वाचा धोका जाणवेल, तेव्हा अण्वस्त्रांचा वापर होईल ! – रशिया

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह

मॉस्को (रशिया) – रशियाकडे स्वसंरक्षणाची क्षमता आहे आणि याची जाणीव सर्वांनाच आहे. जेव्हा रशियाला स्वतःच्या अस्तित्वाचा धोका जाणवेल, तेव्हाच रशिया आणि युक्रेन युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर केला जाईल, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी ‘सी.एन्.एन्.’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘पुतिन आण्विक शस्त्रांचा वापर करणार नाही, यावर पूर्ण विश्‍वास आहे का ?’ असा प्रश्‍न पेसकोव्ह यांना विचारण्यात आला होता.

रशियाकडे आण्विक शस्रास्रांचा मोठा साठा आहे. यापूर्वी ‘तिसरे जागतिक युद्ध झाले, तर ते आण्विक शस्त्रांचा वापर करून लढले जाईल’, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले होते. तसेच २८ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पुतिन यांनी आण्विक दलांना सतर्क रहाण्याचा आदेश दिला होता.