रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या सेवेतील १ सहस्र कर्मचारी पालटले !

जवळच्या लोकांकडून हत्या होण्याची भीती !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःची हत्या होण्याच्या भीतीने त्यांच्या सेवेत असलेले १ सहस्र कर्मचारी पालटले. त्यांच्या जागी नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्तीपूर्वी प्रत्येकाची माहिती घेण्यात येत आहे. पालटण्यात आलेल्या कर्मचार्‍यांनामध्ये स्वयंपाकी, सचिव, कपडे धुणारे, अंगरक्षक आदींचा समावेश आहे. यापूर्वीच पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबियांना देशातील एका सुरक्षित शहरातील छावणीत लपवले आहे.

१. पुतिन यांची हत्या करण्यात यावी, यासाठी रशियातील नागरिकांना, तसेच पुतिन यांच्या जवळच्या लोकांना भडकावण्यात येत असल्याने पुतिन यांनी वरील निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील खासदार लिंडसे ग्राहम यांनी रशियातील लोकांना पुतिन यांची हत्या करण्याचे आवाहन केले होते.

२. फ्रान्सच्या गुप्तचर विभागाच्या एका अधिकार्‍याने ‘पुतिन यांची हत्या करण्याचा एकच मार्ग म्हणजे त्यांना विष देणे’, असे विधान केले होते. रशियाच्या सरकारला त्यांच्या विरोधकांना संपवण्यासाठी विष देऊन मारण्यावरून ओळखले जाते. भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही मृत्यू रशियातील ताश्कंदमध्ये संशयास्पदरित्या झाला होता.