पू. सदाशिव परांजपे, फोंडा, गोवा.
रामनाथी आश्रमात बोलावले असल्याचे समजल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणार’, या विचाराने मन आनंदी होणे
‘एके दिवशी दुपारी ३ वाजता मी संगणकावर सेवा करत होतो. तेवढ्यात आम्हाला निरोप आला, ‘‘तुम्ही दोघांनी रामनाथी आश्रमात यावे.’’ माझ्या मनात विचार आला, ‘कोणता कार्यक्रम असेल ?’ सर्व आवरून आम्ही दोघे निघालो. त्या वेळी माझ्या मनात एक प्रकारचा आनंद होता. बर्याच कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले नव्हते. माझ्या मनात त्यांच्या दर्शनाची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होईल’, असे वाटून माझे मन आनंदी होत होते आणि गुरुकृपेने तसेच घडले. म्हणतात ना, ‘व्यवहारात आनंद होतो आणि अध्यात्मात परमानंद होतो.’ गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) या दर्शनामुळे मला परमानंद झाला.’
पू. (सौ.) शैलजा परांजपे, फोंडा, गोवा.
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन व्हावे’, असे तीव्रतेने वाटू लागताच ती इच्छा पूर्ण करणारे परम दयाळू आणि कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘एकदा रात्री मला प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) सारखी आठवण होऊन माझी त्यांना प्रार्थना होऊ लागली, ‘देवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुमचे दर्शन नाही. तुमचे सगुण रूपातील दर्शन घेऊन मला तुम्हाला पुष्कळ काही सांगायचे आहे.’ तेव्हा गुरुदेवांनी मला ‘अपेक्षाविरहित जगायचे’, हे सांगितलेले आठवले, तरीही मला त्यांची सारखी आठवण येऊ लागली.
२. देवालाही भक्तांच्या भेटीची ओढ लागत असणे
काल रात्री माझ्याकडून गुरुदेवांना सारखी प्रार्थना होत होती; म्हणून मी श्रींना (पू. परांजपेआजोबा यांना) म्हटले, ‘‘मला वाटते, ‘आज आपल्याला गुरुदेव भेटणार आहेत. देव माझी इच्छा पूर्ण करणार आहे.’’ असे म्हणतात की, ‘देवही भक्ताच्या भेटीसाठी भुकेला असतो.’ त्याची मला लगेचच प्रचीती आली. दुसर्या दिवशी दुपारी अकस्मात् निरोप आला, ‘तुम्हाला आश्रमात बोलावले आहे.’ माझ्या मनात आले, ‘का बरे बोलावले असेल ?’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून डोळ्यांत आनंदाश्रू येऊन कृतज्ञता वाटणे आणि त्यांच्याशी बोलायला न सुचणे
तिथे गेल्यावर मला एकदम लख्ख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) बसलेली दिसली. क्षणभर माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना ! माझ्या डोळ्यांत आपोआपच आनंदाश्रू आले आणि माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
ते आम्हाला म्हणाले, ‘‘बोला.’’ प्रथम या अनपेक्षित भेटीने आमची भावजागृती होऊन काही सुचेनासेच झाले. प्रकृती ठीक नसतांना आणि प्राणशक्ती अल्प असतांना ते आम्हाला भेटण्यासाठी आले होते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील चित्रात जाणवलेले पालट !
गुरुदेवांनी आम्हाला त्यांच्या खोलीतील देवतांच्या चित्रांमध्ये झालेले पालट दाखवले.
अ. त्यांच्या पूजेतील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात चैतन्य वाढल्यामुळे ते पूर्ण पिवळे झाले आहे.
आ. श्री दुर्गादेवीच्या चित्रातील निर्गुण तत्त्व वाढले असून ‘ती अधिक प्रमाणात हसत आहे’, असे वाटते.
गुरुदेव याचे शास्त्र सांगतांना म्हणाले, ‘‘देवाची नुसती पूजा करण्यापेक्षा ती भावपूर्ण करण्याने देव जागृत होतो.’’
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या देहात झालेले दैवी पालट दाखवणे
त्यांनी आम्हाला त्यांच्या शरिरात झालेले पालट दाखवले. त्यांच्या दोन्ही हातांचे तळवे गुलाबी झाले असून त्यांतून चैतन्याचे स्रोत बाहेर पडतांना आम्हाला दिसत होते. त्यांचे चरणही चैतन्याने पिवळे झाले आहेत. माझी देवाला ‘देवा, मला हे चैतन्य ग्रहण करण्याची शक्ती दे’, अशी प्रार्थना होऊ लागली.
५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या हाताची बोटे एका प्लास्टिकच्या डब्यातील पाण्यात बुडवल्यावर ते पाणी गुलाबी रंगाचे दिसणे : ‘आपल्या शरिरातील चैतन्याचा काय परिणाम होतो ?’, हे दाखवण्यासाठी गुरुदेवांनी एक प्रयोग करून दाखवला. एका प्लास्टिकच्या डब्यातील पाण्यात गुरुदेवांनी त्यांच्या हाताचे एक बोट बुडवल्यावर पाण्याचा रंग गुलाबी झाला. त्यांनी असे एकेक बोट पाण्यात बुडवले. त्यांनी त्यांच्या हाताची चारही बोटे पाण्यात बुडवल्यावर पाणी गडद गुलाबी रंगाचे दिसू लागले. यावरून ‘त्यांनी पाण्यात नुसती बोटे बुडवली, तरी लगेचच त्यांच्या बोटातील पंचतत्त्वे कार्यरत होतात. गुरुदेवांचा पूर्ण देह जगतासाठी सूक्ष्मातून केवढे मोठे कार्य करत असेल !’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.’
६. ‘स्वतः सर्व करत असूनही त्याचे श्रेय इतरांना देणे’, हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे असामान्यत्व !
गुरुदेव म्हणाले, ‘‘खरेतर मी अर्धा घंटाही बसू शकत नाही. तुम्ही मला शक्ती दिली; म्हणून मी बसू शकलो.’’ केवढा हा मनाचा मोठेपणा ! तेच सर्व करत असूनही ते दुसर्याला मोठेपणा देतात. हेच तर त्यांचे खरे असामान्यत्व आहे.
‘गुरुदेवा, तुम्ही माझ्या मनातील इच्छा पूर्ण केलीत. तुम्ही दिलेल्या ऊर्जेच्या बळावर आम्हाला समष्टीसाठी सेवा करता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |