रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अणूबाँब टाकण्याचा प्रयत्न करू शकतात ! – अमेरिकेची भीती

रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला उद्ध्वस्त

(‘हायपरसोनिक’ म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा ६ पट अधिक वेगाने जाणारे क्षेपणास्त्र)

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर आता त्याचा घातक अशा हापयरसोनिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास चालू केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या ‘किंझल’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करून युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा नष्ट करण्यात आला आहे.

१. रशियाने या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर त्याच्या जनरल एंद्रेई मोरदविचेव यांचा युद्धात मृत्यू झाल्यानंतर केला आहे. रशियाचे आतापर्यंत ५ मेजर जनरल अथवा लेफ्टनंट जनरल या पदांवरील सैन्याधिकारी युद्धात ठार झाले आहेत. त्यामुळे रशियाने या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास चालू केले आहे.

२. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियरे यांनी म्हटले की, जर युक्रेन सातत्याने रशियाच्या सैन्याला प्रत्युत्तर देत राहिला, तर पुतिन नक्कीच अणूबाँबचा वापर करू शकतात. अणूबाँब वापरून युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य केले जाऊ शकते, तसेच पुतिन नवे अणूबाँब बनवण्याची सिद्धता करत आहेत. ते युरोपीय देशांचे सुरक्षाकवच भेदू शकणार्‍या क्षेपणास्त्रांचीही निर्मिती करत आहेत.