मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी फरार !

अंगडिया व्यापार्‍यांवर खोट्या कारवाईचे प्रकरण

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची ? अशी अवस्था झालेले पोलीस प्रशासन ! – संपादक

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी

मुंबई – मुंबादेवी परिसरातील अंगडिया या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यासह तीन पोलीस अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. वंगाटे यांच्या चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर आता मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित केले आहे. सौरभ त्रिपाठी काही दिवसांपासून कामावर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केल्याची बातमी ‘ए.एन्.आय.’ संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

मुंबादेवी परिसरातील अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणी अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार आली होती. त्यानंतर एल्.टी. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे या अधिकार्‍यांविरोधात खंडणी आणि लुटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. चौकशीत सौरभ त्रिपाठी हे या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त असतांना या व्यावसायिकांना धाक दाखवून त्याच्याकडून वरील अधिकार्‍यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करत होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्रिपाठी यांचे स्थानांतर करण्यात आले होते. ३ पोलीस अधिकार्‍यांना अटक केल्यानंतरही त्रिपाठी यांच्याविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली नव्हती. वंगाटे यांच्या चौकशीतून त्रिपाठी यांनीच अंगडिया व्यावसायिकांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.