कसाबच्या वंशावळीचा पुरता बंदोबस्त कसा केला जाणार ?

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाला आज १६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने…

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आक्रमणाच्या कटू स्मृती अजूनही भारतियांच्या मनात कायम आहेत. ‘या आक्रमणाने आपण भारतात सहजपणे आतंकवादी आक्रमणे घडवू शकतो’, हेच जणू पाकिस्तानने दाखवून दिले. या आक्रमणातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबला फाशी देण्यात आली; मात्र कसाबची वंशावळ आजही भारतात आतंकवादी आक्रमणे घडवण्याचे मनसुबे रचत आहेत. या वंशावळीचा पुरता बंदोबस्त कसा केला जाणार, हा खरा प्रश्न आहे.

अजमल कसाब हॉटेल ताजवर झालेले आक्रमण

१. पाकिस्तान हे ‘आतंकवादी संघटनांनी पोखरलेले राष्ट्र’ !

जेव्हा जेव्हा आतंकवादी आक्रमणांची चर्चा होते, त्या त्या वेळी २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीची घटना डोळ्यांसमोर आल्याविना रहात नाही. विशेष म्हणजे आजही भारतासमोर आतंकवादी कारवायांचे आव्हान कायम आहे. या आक्रमणाच्या स्मृती जागवतांना आतंकवादाचे आव्हान, त्यामागील कारणे, तसेच त्यावर मात करण्याच्या उपाययोजना यांची चर्चा महत्त्वाची ठरते. अर्थात् भारतातील आतंकवादी कारवायांसाठी पाकिस्तानकडून दिले जाणारे प्रोत्साहन हे उघड सत्य आहे. त्यादृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टींचा वेध घेणे आवश्यक ठरेल. १६ डिसेंबर २०१४ या दिवशी पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी स्कूलमध्ये ‘तेहरिक ए तालिबान’ या संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेले मृत्यूचे तांडव, त्यात जवळजवळ १५० निष्पाप बालके, तसेच त्यांचे शिक्षक यांची झालेली हत्या, शिया आणि सुन्नी यांच्यातील हिंसक रक्तपात करणारे संघर्ष अन् वेळोवेळीच्या आतंकवादी कारवाया यांमुळे पाकिस्तान हे ‘आतंकवादी संघटनांनी पोखरलेले राष्ट्र’ म्हणून नावारूपाला आले. त्यांनीच पोसलेला ‘आतंकवाद’रूपी भस्मासुर त्यांच्यावरच उलटत आहे. तरीही पाकिस्तानातील काही नामवंत नेते या हिंसक घटनांना अफगाणिस्तान आणि भारत यांनाच उत्तरदायी समजतात. त्यामुळे काश्मीरचे तुणतुणे वाजवून तिथे दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता बळावत आहे.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

२. पाकिस्तानची दयनीय स्थिती

पाकमध्ये जवळजवळ ५० वर्षे ‘मिलिटरी रूल’च (लष्करी राजवट) होता. याचे महत्त्व आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तेथील जनतेचे त्यांच्यावर होणार्‍या अन्यायावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाक लष्कर कोणत्या ना कोणत्या कारणाने भारताशी नवनवीन कुरापती काढून संघर्ष चालू ठेवण्याचा सतत प्रयत्न करत होते. वर्ष १९६५ आणि वर्ष १९७१ मध्ये झालेल्या युद्धांमधील दारुण पराभवानंतर भारताशी प्रत्यक्ष युद्ध करणे परवडणारे नाही, याची जाणीव पाक लष्कर आणि तथाकथित पाक सरकारलाही झाली आहे. आतापर्यंत भारतासमवेतच्या संघर्षाला आपणच उत्तरदायी आहोत, याची जाणीव असूनही त्या पराभवाची सल त्यांच्यामध्ये धुमसत आहे. पाक सैनिकांच्या मनामध्ये केवळ भारतियांविषयी सूडाचीच भावना असल्याने ते लढण्यासाठी उद्युक्त् होतात. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना अमेरिकन आणि रशियन देशांच्या दबावाखाली न रहाता पाकचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्यावर दबाव टाकून पाकव्याप्त काश्मीरची सोडवणूक करून घेता आली असती; पण नेहमीसारखे आपले राजकीय नेतृत्व दुबळे ठरले अन् ताश्कंदमधील कराराचीच पुनरावृत्ती होऊन आम्ही सैनिकांनी बंदुकीच्या जोरावर जे कमावले, ते राजकीय नेत्यांनी वाटाघाटीमध्ये गमावले.

पाकिस्तानची निर्मितीच धर्माच्या आधारावर, तसेच भारत द्वेषावर झाली आहे. पाकिस्तान ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून निर्माण झाले असले, तरी त्यातील पंजाब, सिंध, गुजरात, वजरीस्तान, स्वात खोरे आणि बलुच यांमध्ये एकात्मता नाही. तेथील भ्रष्टाचार हीसुद्धा चिंतेची गोष्ट आहे. बेनझीर भुत्तो पंतप्रधान असतांना त्यांचे पती असिफ अली झरदारी सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये स्वतःची १० टक्के दलाली घेत; म्हणून त्यांना राजकीय क्षेत्रात ‘टेन परसेंट’ असेही नाव पडले होते. तेथील एकूण अंदाधुंद परिस्थितीमुळे तिथे लोकशाही नांदत आहे, असे चित्र उभे करण्यात आले असले, तरी त्या देशावर लष्कर प्रमुख आणि ‘आय.एस्.आय.’ गुप्तचर यंत्रणा यांची पकड मजबूत आहे; म्हणून कुठलाही निर्णय तेथील सरकारला सैन्याच्या अनुमतीविना घेता येत नाही.

अफगाण सीमेला लागून असलेल्या बलुच आणि स्वात या प्रांतांत तेथील राज्यव्यवस्थेने दुर्लक्ष केल्याने, तसेच स्थानिक संस्था तिथे असलेल्या प्रमुख टोळ्यांच्या असल्याने, त्यांच्यावर जरब बसवण्याचे धाडस आणि शक्ती पाकिस्तान सरकारला झालेली नाही. अतिशय दुर्गम आणि मागासलेला असा टेकड्यांचा हा भाग ‘अल कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांच्या कारवायांचे तळ उभे करण्यासाठी ओसामा बिन लादेनसारख्या क्रूरकर्म्याला उपयोगी ठरला. भारताविषयीचा द्वेष ज्वलंत ठेवण्यासाठी या देशातील मुसलमानांचा किती छळ होतो, याविषयीच्या भ्रामक कल्पना तेथील गरीब, तसेच अशिक्षित तरुण पिढीच्या मनावर बिंबवून ‘भारताविरुद्ध लढणे, हे देशासाठी केलेले एक पवित्र धर्मकार्य आहे’, असे पटवून देण्यासाठी पाक सरकार सतत प्रयत्नशील असते. या अशा प्रयत्नांमुळे गरीब जनतेचे लक्ष आपल्या समस्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करण्याखेरीज पाकला गत्यंतर नाही.

३. पाकिस्तान आतंकवाद्यांकडून विविध आमिषे दाखवून करवून घेत असलेली मानसिकता

वर्ष १९७१ च्या लढाईनंतर भारताशी आपण प्रत्यक्ष युद्ध जिंकू शकत नाही, याची जाणीव तेथील सैन्याला झाली. तरीही भारताशी शत्रूत्व कायम ठेवण्यासाठी त्यांनी खलिस्तानवादी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेते यांच्याद्वारे आतंकवादी कारवाया चालूच ठेवल्या. या आतंकवादी कारवाया वाढवत त्यांनी त्या ‘बोडो’, ‘उल्फा’ आणि नक्षलवादी यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत. आपल्या तत्कालीन कमकुवत संरक्षण व्यवस्थेमुळे २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी १० आतंकवादी पाकिस्तानी सैनिकांच्या साहाय्याने एका लहान बोटीमध्ये बसून कोणत्याही अटकावाविना, कोणत्याही प्रतिकाराविना, समुद्रमार्गे मुंबईत आले. त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी आतंकवादी आक्रमणे केली. त्यात शेकडो माणसे मारली गेली. या आतंकवाद्यांमधील फक्त एक आतंकवादी अजमल कसाब घायाळ अवस्थेत पकडला गेला. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि हमालाचे काम करणार्‍या या आतंकवाद्याने कारागृहात शाही पाहुणचार घेतला. हा खटला ४ वर्षे चालला. या काळात कसाबवरील संरक्षणावर आणि त्याला खाण्यासाठी लागणार्‍या बिर्याणीवर भरघोस व्यय झाला. भारताने कसाबवर साधारणपणे ३२ कोटी रुपये व्यय केल्याची माहिती समोर आली होती. भारतीय संसदेवर, म्हणजे भारतीय लोकशाहीच्या हृदयावर प्रत्यक्ष घाव घालणारा काश्मिरी आतंकवादी महंमद अफझल हाही ११ वर्षे भारतीय पाहुणचार घेत होता.

या सर्व गोष्टी आतंकवाद्यांचे मनोधैर्य वाढवू शकतात आणि पाकिस्तानही आतंकवाद्यांना ठामपणे सांगू शकतो, ‘भारतात आतंकवादी कारवायांमध्ये पकडला गेला, तरी तुम्हाला विशेष शिक्षा होईलच, असे नाही आणि झालीच तरी आम्ही एखादे विमान अपहरण करून तुमची सुटकाही करू शकतो.’ भारतीय कायद्यानुसार गुन्हेगार १८ वर्षांखालील असला, तर त्याला ‘बालगुन्हेगार’ म्हणून फाशीची किंवा सक्तमजुरीसारखी कठोर शिक्षा होऊ शकत नाही. त्याला बालसुधारगृहात पाठवले जाते. हे लक्षात घेऊन नजीकच्या काळात पाकिस्तानकडून १८ वर्षांखालील किंवा अगदी १६ वर्षांखालील मुलांना भारतात पाठवून त्यांच्याकडून आतंकवादी आक्रमणे घडवून आणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही, तर त्यांना कसाब आणि महंमद अफझल याचे उदाहरण देऊन ‘तुम्ही दिलेले काम झाल्यानंतर स्वत:ला इजा होऊ न देता शरणागती पत्करा, म्हणजे निदान ४-५ वर्षे तरी मृत्यूचे भय बाळगण्याचे कारण नाही. तसेही तुम्ही भारतात हुतात्मा होण्यासाठी गेले असल्याकारणाने मरणानंतर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणारच’, अशी मानसिकता निर्माण केली गेली, तर मात्र भारतात मोठे संकट उभे राहू शकते.

काही वर्षांपूर्वी आतंकवादी संघटना तरुण मुलींना प्रशिक्षण देऊन भारतात जिहादी म्हणून पाठवण्याच्या सिद्धतेत होत्या; पण त्या तरुण मुली कारवाईच्या वेळी मरण पावल्या, तर ‘त्यांच्या शरिराला परपुरुषाचा स्पर्श होईल’, या भीतीने आणि धार्मिक भावनेने ती योजना बाजूला ठेवण्यात आली; परंतु ती पुन्हा कधी उचल खाईल, हे सांगता येत नाही. मध्यंतरी आय्.एस्.आय.ने असे घोषित केले होते, ‘भारतात भुसुरूंग पेरल्यास, भारतीय सैनिक मारल्यास काही सहस्र रुपये आणि त्यांचे शिर कापून आणल्यास ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.’ यातून पाकची मानसिकता लक्षात येते.

४. शासनकर्त्यांनी मवाळ धोरण सोडून आक्रमक रणनीती वापरणे अत्यावश्यक !

वर्ष १९९३ मध्ये मुंबईत घडवण्यात आलेल्या बाँबस्फोट मालिकांमागील प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीच्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार पाकिस्तानात आहे, याचे ठोस पुरावे केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘इंटरपोल’च्या सर्वसाधारण सभेत देऊनसुद्धा पाकने त्यावर ठोस कारवाई केली नाही. खरेतर पाकच्या संदर्भातील आपल्या वेळोवेळच्या शासनकर्त्यांचे मवाळ धोरणच त्या देशाचे मनोबल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. ‘आपण कितीही अरेरावी केली, उर्मटपणा दाखवला, आतंकवादी कृत्ये केली, तरी भारताचे शासनकर्ते नरमाईने घेऊन स्वत:च सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यास सिद्ध होतात’, याची त्यांना जाणीव आहे; पण आताच्या शासनकाळात तशी स्थिती राहिलेली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते हे ओसामा बीन लादेनला ‘लादेनजी’ म्हणून, तर हाफिजला ‘साहेब’ म्हणून संबोधत असतील, तर उद्या दाऊदलाही असाच शाब्दिक सन्मान दिला जाणार का ?, हा खरा प्रश्न आहे.

‘शत्रूला गोळ्या घालायच्या असतात, शत्रूचे मनसुबे नष्ट करायचे असतात, शत्रूच्या बलस्थानांवर आक्रमणे करून त्याचे कंबरडे मोडायचे असते, ‘शत्रूची अधिकाधिक हानी हाच आपला लाभ’, हे लक्षात घ्यायचे असते. ‘आपल्या संरक्षणापुढे, आपल्या स्वार्थापुढे शत्रूचा स्वार्थ, शत्रूचे हित याचा विचार करायचा नसतो’, ही रणनीती शासनकर्ते प्रत्यक्ष कृतीत आणणार नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानची डोकेदुखी थांबणार नाही. त्यामुळे एका कसाबचा अंत झाला असला, तरी असे कसाब वेळोवेळी भारतात येतच रहाणार आणि देशाचा त्रास वाढवत रहाणार, हे लक्षात घ्यायला हवे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

संपादकीय भूमिका :

पाकला भारताविरोधात रोखायचे असेल, तर त्याच्या बलस्थानांवर आक्रमणे करून त्याचे कंबरडे मोडायला हवे !