सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी केलेल्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी ५.१.२०२२ या दिवशी केलेल्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ४.१.२०२२ आणि ५.१.२०२२ या दिवशी कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले. या नृत्यप्रकारांचा अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन प्रकारच्या साधकांच्या गटांवर प्रयोग करण्यात आले. ५.१.२०२२ या दिवशी सौ. सोनिया परचुरे यांनी केलेल्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांच्या वेळी देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

५.१.२०२२

सौ. सोनिया परचुरे

१. त्रितालात विविध प्रकारचे ‘तत्कार’ सादर करणे

हा प्रकार सादर करत असतांना तबला विशारद श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर विलंबित, मध्य आणि द्रुत या तिन्ही लयीत ‘तीन ताल’ (त्रिताल) वाजवला. तेव्हा पार्श्वसंगीतावर सतारीवर त्रितालाचा ‘लेहरा’ वाजवण्यात आला. (सूरवाद्यावर एखाद्या रागामध्ये तालांच्या मात्रांइतकी बांधलेली स्वरमाला म्हणजे लेहरा.) त्यावर सौ. सोनियाताईंनी विलंबित, मध्य आणि द्रुत या तिन्ही लयीत विविध प्रकारचे तत्कार (टीप १) सादर केले. दोन्ही पायांची हालचाल होत असल्यामुळे जेव्हा त्यांनी डाव्या पायाने तत्कार केले, तेव्हा त्यांची चंद्रनाडी आणि उजव्या पायाने तत्कार केल्यावर त्यांची सूर्यनाडी चालू झाली. तत्कार करत असतांना सौ. सोनियाताईंच्या दोन्ही पायांतून पुष्कळ प्रमाणात तारक आणि मारक शक्तींची लालसर रंगाची वलये भूमी अन् वातावरण यांच्याकडे प्रक्षेपित झाल्याचे सूक्ष्मातून दिसले. अशा प्रकारे दोन्ही पायांनी तत्कार केल्यावर कलाकाराच्या चंद्र आणि सूर्य या नाड्या आलटून-पालटून चालू होत होत्या.

टीप १ : पावलांचे विशिष्ट प्रकारे संचलन करून पायांच्या आघाताद्वारे जे बोल प्रकट केले (काढले) जातात, त्यांना ‘तत्कार’ असे म्हणतात.

थाट करतांनाची सौ. सोनिया परचुरे यांची एक भावमुद्रा
कु. मधुरा भोसले

२. कथ्थकमधील विविध ‘थाट’ (टीप २) सादर करणे

हा प्रकार सादर करतांना तबला विशारद श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर विलंबित, मध्य आणि द्रुत या तिन्ही लयीत ‘तीन ताल’ वाजवला. तेव्हा चित्र काढतांना ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती थाटात उभी असते, म्हणजे विशिष्ट प्रकारे शरिराची स्थिती (पोज) घेऊन उभी असते, तसे सौ. सोनियाताईंनी विविध प्रकारचे थाट सादर केले. तेव्हा त्यांच्या शरिराची विशिष्ट ठेवण (पोज) होत होती.

(टीप २ : कथ्थक नृत्याच्या आरंभी थाट केला जातो. यामध्ये कोणत्याही भावाचे प्रदर्शन केले जात नाही. केवळ अंगप्रत्यंगाच्या साहाय्याने आकर्षकपणे शरिराची एकाच जागेवर उभी केलेली आकृती म्हणजे ‘थाट’ होय.)

२ अ. विविध लयीत ‘थाट’ सादर करणे : त्यांनी विविध थाट जलद किंवा संथ लयीत आणि विविध प्रकारच्या हस्तमुद्रा अन् पदन्यास करत अतिशय लयबद्धरितीने केले. जेव्हा त्या संथ गतीने पदन्यास किंवा हस्तमुद्रा करत होत्या, तेव्हा त्यामध्ये लालित्याचे प्रमाण अधिक होते आणि त्यातून तारक शक्ती प्रक्षेपित होत होती. जेव्हा त्या जलद गतीने पदन्यास किंवा हस्तमुद्रा करत होत्या, तेव्हा त्यांच्यामध्ये लालित्याचे प्रमाण अल्प होते आणि त्यातून मारक शक्ती प्रक्षेपित होत होती. त्यांनी केलेल्या विविध थाटांच्या वेळी त्यांचे डोळे आणि मुखावरील हावभाव यांतून विविध प्रकारच्या भावभावना व्यक्त होऊन विविध प्रकारच्या दैवी गंधांच्या लहरी वातावरणात प्रक्षेपित झाल्या.

२ आ. तीनतालावर ‘सीता गत , मयूर गत आणि नाग गत’ हे नृत्यप्रकार सादर करणे : हस्तमुद्रा, पदन्यास आणि देह संचालनासह मुखावरील भाव अन् एकूण देहबोली यांतून सौ. सोनियाताई यांनी सीता गत (टीप ३), मयूर गत आणि नाग गत हे सुंदररित्या सादर झाले.

टीप ३ : कथ्थक नृत्याचे अविभाज्य अंग मानल्या जाणार्‍या गत या प्रकारामध्ये ढंगदारपणे चालत एखादी विशिष्ट मुद्रा अथवा एखाद्या नायक अथवा नायिकेची विशिष्ट अवस्था प्रस्तुत केली जाते. उदा. श्रीकृष्णाची बासरी घेण्याची पद्धत, राधेची घागर अथवा घुंघट घेण्याची पद्धत इत्यादी.

२ आ १. कथ्थक नृत्यातील ‘सीता गत’ हा नृत्यप्रकार सादर करणे : माता सीतेची भूमिका आणि सीता स्वयंवराच्या वेळी तिच्या मनातील आनंद, रावणाने सीतेचे हरण करतांना तिची झालेली भयग्रस्त आणि अगतिक स्थिती, अशोक वाटिकेतील तिची दुःखद अन् शोकाकुल स्थिती इत्यादी यांचे दर्शन सौ. सोनियाताईंनी घडवले. तेव्हा सीतामातेच्या हृदयात प्रभु श्रीरामाप्रती असणारा निस्सीम भक्ती आणि श्रद्धाभाव ‘सीता गत’ या नृत्यप्रकारातून अनुभवण्यास मिळाला.

२ आ २. कथ्थक नृत्यातील ‘मयूर गत’ हा नृत्यप्रकार सादर करणे : या नृत्य-प्रकारात ‘मोर वनामध्ये विचरण (विहार) करत असतांना त्याची चाल कशी असते, तो सभोवती मान वळवून कसा पहातो, मोर ‘केकारव’ (मोराचा आवाज) करत असतांना त्याची मान आणि चोच यांच्या होणार्‍या हालचाली आणि पाऊस पडत असतांना मोराला आनंद झाल्यावर तो त्याचा पिसारा फुलवून कशा प्रकारे नृत्य करतो’, या मोराच्या सर्व कृती सौ. सोनियाताईंनी सुंदर रितीने मयूर गतीतून व्यक्त केल्या. तेव्हा सौ. सोनियाताईंच्या ठिकाणी निळसर रंगाचा मोर उभा असल्याचे जाणवले आणि मनाला आनंदाची अनुभूती आली. तेव्हा मला सूक्ष्मातून वृंदावनातील मोराचे दृश्य दिसले. ‘वृंदावनातील मोर श्रीकृष्णाला शोधत आहे आणि जेव्हा त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. तेव्हा त्याला आनंद होऊन त्याने थुईथुई नाचून अतिशय सात्त्विक नृत्य केले’, असे दृश्य मला दिसून माझा श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत झाला.

२ आ ३. कथ्थक नृत्यातील ‘नाग गत’ हा नृत्यप्रकार सादर करणे : या नृत्य प्रकारात सौ. सोनियाताईंनी ‘हा नाग कशा प्रकारे सरपटत जातो आणि फणा काढून इकडे-तिकडे पहातो’, याचे दर्शन या नृत्यप्रकारातून अत्यंत उत्कृष्टरित्या घडवले. तेव्हा मला सौ. सोनियाताईंच्या ठिकाणी पिवळ्या धमक नागाचे दर्शन झाले. हा नाग शिवलोकातील असून तो काही काळ पृथ्वीवर आल्याने तो शिवाचे मंदिर शोधत असल्याचे मला सूक्ष्मातून जाणवले. ‘नाग गत’ करत असतांना सौ. सोनिया यांच्याकडून सात्त्विक नागाची स्पंदने प्रक्षेपित होऊन सूक्ष्मातून शिवाने गळ्यात धारण केलेल्या वासुकी नागाचे मला दर्शन झाले आणि माझा शिवाप्रतीचा भाव जागृत झाला.

३. ‘सुंदर ते ध्यान’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कथ्थक नृत्य सादर करून नृत्य प्रयोगाचा शेवट करणे

सौ. सोनियाताई या अभंगावर नृत्य करत असतांना त्यांनी कमरेवर हात ठेवून उभा असलेले, कानात मकर कुंडले असणार्‍या, भक्तांकडे पाहून स्मितहास्य करणार्‍या आणि गळ्यात तुळशीहार घातलेल्या श्री विठ्ठलाच्या भावमूर्तीचे दर्शन नृत्यातून घडवले. त्यानंतर त्यांनी फिरत्या चाकावर मातीचे मडके घडवणारे संत गोरा कुंभार आणि चिपळ्या वाजवून श्री विठ्ठलाच्या कीर्तनात मग्न झालेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची भूमिका नृत्यातून सादर केली. तेव्हा महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त आणि वारकरी संतांचे जणू प्रत्यक्ष दर्शनच नृत्यातून झाले.

विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन गावागावांतून पंढरपुराकडे जाणार्‍या, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या भाविक स्त्रिया आणि श्री विठ्ठलाप्रती अत्यंत भोळाभाव असलेले भाविक यांची जेव्हा पंढरपूरच्या दिशेने वारी निघते, तेव्हा हे समस्त वारकरी स्वतःचे देहभान विसरून विठ्ठलाच्या नामगजरात नाचत-गात पंढरपूरकडे प्रयाण करतात. श्री विठ्ठलाच्या भक्तीत निमग्न झालेले वारकरी जेव्हा पंढरपुराला पोचतात, तेव्हा ते दुरूनच त्याच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात आणि प्रत्यक्ष मंदिरात जाऊन प्राणप्रिय असणार्‍या त्याच्या मूर्तीचे डोळे भरून दर्शन घेतात. तेव्हा ‘भक्तीमय झालेल्या वारकर्‍यांना पाहून श्री विठ्ठलही आनंदाने स्मितहास्य करून त्यांच्या कीर्तनात डोलतो’, याचे अतिशय सुंदर दर्शन सौ. सोनियाताईंनी त्यांच्या नृत्यातून घडवले. त्यांचे नृत्य पाहिल्यावर सर्वांनाच पंढरीच्या विठ्ठलाचे भावमय दर्शन झाल्याचा आनंद आणि समाधान लाभले. सौ. सोनियाताईंनी इतक्या भावपूर्णरित्या नृत्य केले की, कार्यक्रमस्थळी वैकुंठाचे वातावरण १० टक्के निर्माण झाले होते. हे नृत्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले आणि कुणीही जागेवरून हालचाल केली नाही. ‘सौ. सोनियाताईही भावाची अत्यंत उच्चतम अवस्था अनुभवत आहेत’, असे त्यांना पाहून जाणवले.

(प्रत्यक्षातही या नृत्यानंतर सौ. सोनियाताई यांचीही पुष्कळ भावजागृती झाली होती. त्यांना अश्रू थांबवणे अनावर झाले होते. हे नृत्य करतांना त्या नृत्याशी पूर्ण एकरूप झाल्या होत्या. – कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.)

४. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष

या नृत्यानंतर सौ. सोनियाताई यांची सकारात्मक प्रभावळ दुपटीने वाढलेली आढळली.

५. कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे सौ. सोनियाताईंच्या माध्यमातून मला कथ्थक नृत्यातील विविध प्रकार आणि भावपूर्ण नृत्य यांमुळे कार्यक्रमस्थळी झालेले भावमय वातावरण अनुभवता आले अन् माझा श्रीविठ्ठलाप्रतीचा भाव जागृत झाला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२२)

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक