रशियाने जर युद्धविराम घोषित केला, तरच इस्रायलमध्ये पुतिन यांच्याशी चर्चा करू ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची अट

कीव (युक्रेन) – रशियाने जर युद्धविराम घोषित केला, तरच इस्रायलमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी सिद्ध आहोत, अशी अट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी घातली आहे. पुतिन यांच्या भेटीसाठी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मॉस्कोला भेट दिली होती. तसेच ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या प्रमुखांंशीही बोलले. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थी करण्यास साहाय्य म्हणून बेनेट यांनी हा पुढाकार घेतला आहे.

आम्हा सर्वांना मारल्यावरच रशिया कीव नियंत्रणात घेऊ शकतो ! – झेलेंस्की

झेलेंस्की म्हणाले की, बेनेट यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली; पण त्याविषयीची माहिती मी अधिक उघड करू शकत नाही. रशिया आम्हा सर्वांची हत्या करील, तेव्हाच तो युक्रेनची राजधानी नियंत्रणात घेऊ शकतो. रशियाचे ध्येय आम्हाला मारण्याचे असेल, तर त्याच्या सैनिकांना येऊ द्या. जर रशियाने असंख्य बाँबस्फोट घडवून आणले आणि संपूर्ण प्रदेशाचा इतिहास, कीव, तसेच युरोपचा इतिहास पुसून टाकला, तर ते कीवमध्ये प्रवेश करू शकतील.