आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

हलालच्या पैशाचा होणारा दुरुपयोग जाणून सरकारने त्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित !

कुठल्याही व्यक्तीला तिच्या आयुष्यातील भूतकाळातील कटू आठवणींना उजाळा द्यायचा नसतो. हेच राष्ट्रालाही लागू पडते. भारतावर प्रथम मोगलांनी आणि नंतर इंग्रजांनी आक्रमण केले. या हिंदुद्वेषी आक्रमकांनी या मातीतील वैभवशाली हिंदु परंपरा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या आक्रमकांनी हिंदूंच्या पुढच्या पिढ्यांकडून हिंदु धर्माचे गुणगान गायले जाणार नाही, अशी पूर्ण व्यवस्था करून ठेवली. त्यासाठी त्यांनी या हिंदूबहुल भारतातील वस्त्या, गावे, तालुके, शहरे, राज्य, रस्ते आदींना इस्लामी किंवा ख्रिस्ती नावे दिली. इतकेच नव्हे, तर पाठ्यपुस्तकांतही आक्रमकांचाच बोलबाला कसा राहील ? हे पाहिले. ज्या मोगलांनी भारतावर आक्रमण करून प्रचंड नरसंहार केला, हिंदु महिलांवर बलात्कार केले, मंदिरे नष्ट केली, अशा आक्रमकांना नायक ठरवण्याचा प्रयत्न देशात उघडउघड होतांना दिसतो.

देशाच्या राष्ट्रपती भवनाच्या परिसरात आजही ‘मुघल गार्डन’ अस्तित्वात आहे. देशात आजही अनेक गावे, शहरे, रस्ते आदींना अकबर, बाबर, औरंगजेब, अफझलखान, गझनी आदी इस्लामी आक्रमकांची नावे आहेत. महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ हे त्यातीलच एक नाव आहे. अशी शेकडो नावे आहेत. तथापि स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी ही नावे पालटण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. ज्याने भारताची अमाप लूट केली, अशा वास्को द गामाचे नाव स्वतंत्र भारतातील गोवा राज्यातील एका शहराला आजही आहे. धूर्त इंग्रजांनी प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीवर घाला घालून हिंदुद्वेषी मॅकॉले शिक्षणपद्धत भारताच्या उरावर बसवली आणि त्याद्वारे आज मोगल अन् इंग्रज आक्रमकांचाच उदोउदो होत आहे. याच मोगल आक्रमकांच्या ५ पातशाह्या बुडवून हिंदवी स्वराज्याची पताका डौलाने फडकावणारे आणि पोर्तुगिजांना (ख्रिस्त्यांना) धडा शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र पाठ्यपुस्तकात तुलनेने अल्प स्थान दिसून येते. अलीकडच्या काही वर्षांत तर कर्नाटकमध्ये लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा आणि असंख्य हिंदु महिलांची अब्रू लुटणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याची टूम निघाली आहे. सांगायचे तात्पर्य हे की, हिंदूंना त्यांची गौरवशाली हिंदु संस्कृती विसरायला लावण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून रचले गेले आणि दुर्दैवाने त्याला स्वातंत्र्योत्तर काळातील आजपर्यंतचे शासनकर्ते बळी पडत राहिले. या आक्रमकांच्या स्मृती पुसायला हव्यात, त्याऐवजी आपण आजही त्या मोठ्या अभिमानाने जपत आणि मिरवत आहोत. हे आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे. ही पराकोटीची स्वाभिमानशून्यता आहे. यास अपवाद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे. देशपातळीवरही आक्रमकांच्या सर्व स्मृती पुसल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारने प्रसंगी कठोर कायदा केला पाहिजे, तरच हिंदूंची पुढची पिढी स्वतःला ‘हिंदु’ म्हणवून घेऊ शकेल !