मुंबई, १० मार्च (वार्ता.) – अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या विविध मंडळांतील रिक्त पदे भरण्याविषयी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित केली होती. अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री विश्वनाथ कदम यांनी या लक्षवेधीला सभागृहात उत्तर दिले. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत. त्यामुळे सध्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला नवाब मलिक उपस्थित राहिलेले नाहीत; मात्र अटकेत असले तरी अद्यापही ते मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे सभागृहात जरी विश्वनाथ कदम यांनी उत्तर दिले असले तरी, प्रत्यक्ष शासनाकडून अधिकृतरित्या अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या नावे या लक्षवेधीला लेखी उत्तर देण्यात आले आहे.