नगर – येथील नगर-सोलापूर रोडवरील कडेगाव बायपास चौक परिसरात अवैधरित्या चालू असलेल्या जैव इंधनाची विक्री जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पोलीसदल यांनी संयुक्तपणे कारवाई करून उघडकीस आणली. येथे धाड टाकून ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या अहवालानुसार सदर गुन्ह्यातील सहआरोपी हे राजकीय पक्षाचे नगर शहराचे अध्यक्ष असून ते हा व्यवसाय अनुमाने १ वर्षापासून करत आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण २५ आरोपींपैकी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी सध्या जामिनावर सुटले आहेत, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
सदर प्रकरणाच्या व्यतिरिक्त नगर जिल्ह्यात मौजे केडगाव, मौजे साकत, मौजे मालदा रोड, तसेच मौजे आळसुंदे येथेही जैव इंधनाची अवैध विक्री करण्यात येत आहे. सदर टोळीच्या सूत्रधारांकडे रासायनिक पदार्थ साठवणुकीचा कोणताही परवाना नाही. साठवणूक करण्यात येणारे ज्वलनशील पदार्थ नागरिकांच्या जीवितास धोकादायक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचे निदर्शनास आले आहे.