मंत्री नवाब मलिक यांना वाचवणार्‍या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचा ८ मार्चला विधीमंडळावर मोर्चा

नवाब मलिक

कणकवली – आतंकवादी आक्रमणातील आरोपींकडून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आणि त्यांच्या मुलाने भूमी खरेदी केली. त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्या व्यवहारात नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणात ‘मनी लॉन्ड्रिंग’ (मनी लॉन्ड्रिंग म्हणजे अवैधरित्या मिळवलेला पैसा कायदेशीररित्या मिळवला गेला आहे, असे दाखवणे) केले. भूमीच्या मूळ मालकांच्या तक्रारी नंतर ‘ईडी’ने त्यांना अटक केली. असे असतांना नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ ८ मार्चला विधीमंडळावर लाखोंचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे कोकण विभागप्रमुख आमदार प्रसाद लाड यांनी दिली. येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत लाड बोलत होते. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरचिटणीस बबलू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी लाड म्हणाले,

आमदार प्रसाद लाड

१. ‘‘ईडी’ने ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चे काढले, तसेच आंदोलने केली.

२. ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणी ‘ईडी’ने ९ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मुंबईतील भूमीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही भूमी परस्पर ‘कुलमुखत्यार पत्र’ दाखवून विकली गेली. भूमीच्या मूळ मालकांना पैसे मिळालेच नाहीत. हे पैसे कुठे गेले ? बाँम्बस्फोट झाला तिथे गेले का ?, भाग्यनगरमध्ये आक्रमण झाले, तेथे गेले का ?, असे अनेक प्रश्‍न जनतेच्या मनात आहेत.

३. भूमीचा व्यवहार वर्ष २००३ मध्ये चालू झाला. त्यानंतर वर्ष २००५ मध्ये व्यवहार संपला. त्या वेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. मुंबईत बाँबस्फोट ६ ठिकाणी झाले, त्यासाठी हे पैसे लागले का ? दाऊद इब्राहिमने देशात अनेक कृत्ये केली आहेत. त्याला खतपाणी कोण घालत होते ? त्या वेळी काँग्रेस आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

४. देशात भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही आता चौकशी करत आहोत. मंत्र्याने आतंकवादी लोकांकडून भूमी खरेदी केली आहे. ‘नवाब मलिक यांचे त्यागपत्र घेणार नाही’, असे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे; मात्र त्यांनी त्यागपत्र दिलेच पाहिजे.