पोषण आहारातील तांदूळ खासगी गोदामात जातो, तर प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही ? – संपादक
नाशिक – शालेय पोषण आहारात वापरल्या जाणार्या तांदुळाचा साठा पंचवटीतील हिरावाडी परिसरातील खासगी गोदामात मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती बचत गट महासंघाला मिळाली होती. त्याआधारे बचत गटाच्या सरला चव्हाण, सुषमा पगारे यांसह अन्य महिलांनी यंत्रणेला कल्पना देत गोदामाच्या ठिकाणी पहाणी केली असता तेथे ४०० ते ५०० क्विंटल तांदूळ साठवलेला असल्याचे आढळले, तसेच तांदळाची प्रतही निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचा हा तांदूळ असल्याचे सांगितले जात आहे. अडीच वर्षांपूर्वीपासून हा तांदूळ गोदामातच पडून असल्याचे या वेळी लक्षात आले. (इतकी वर्षे तांदूळ पडून आहे, हे प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही ? तांदळाची प्रत निकृष्ट होण्यासाठी उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक. – संपादक)
२ वर्षांपूर्वी मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून पोषण आहाराचे वाटप केले जात होते. त्यात या तांदळाचा वापर झाल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनकर यांनी संबंधित गोदामाला भेट दिली. या वेळी धनकर यांनी सांगितले की, हा तांदूळ नेमका कुणाचा आहे, हे पोषण आहार विभागाला विचारले जाईल. (गोदामामध्ये येणार्या आणि जाणार्या धान्याची नोंद केली जात नाही का ? असे अजून कोणत्या ठिकाणी होते हेही पहाणे आवश्यक आहे. – संपादक)