क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मैदानाला ‘झाशीच्या राणी’चे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मालाड येथील मैदानाचे नामकरण ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ द्या, शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई – क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मालाड येथील मैदानाचे नामकरण ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’, असे करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीकडे याविषयीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानासाठी विकासनिधी देऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारली होती. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजपकडून त्याला विरोध करण्यात आला होता. ‘पी’ उत्तर विभाग समितीच्या अध्यक्षा संगीता सुतार यांनी महापौरांना पत्र लिहून या मैदानाला ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यानंतर उपमहापौर अधिवक्ता सुहास वाडकर, यांसह शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ हुंडारे, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, नगरसेविका गीता भंडारी, विनया सावंत यांनीही या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या सर्वांचे प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायाने बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिकेने सदर मैदानाला अद्यापही कुणाचेच नाव दिलेले नाही. या मैदानाला टिपू सुलतान याचे नाव देऊन पालिकेचे बोधचिन्ह अयोग्य पद्धतीने वापरले गेले. याविषयी संबंधितांच्या विरोधात पालिका प्रशासन कारवाई करेल, अशी भूमिका यापूर्वी व्यक्त केली आहे.