संगणक प्रणाली चाचणीत अनेक जण अनुत्तीर्ण
पुणे – वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाईन मिळतो; परंतु पक्का परवाना काढण्यासाठी भोसरीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ (आय.डी.टी.आर्.) येथील चाचणी केंद्रात जावे लागते; परंतु पक्क्या परवान्यासाठीच्या चाचणीमध्ये अनेकजण अनुत्तीर्ण होतांना दिसत आहेत. अनेकांना ती चाचणी अडचणीची ठरत आहे. परिणामी पक्का परवाना काढतांना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.
वाहन चालवण्याच्या शिकाऊ परवान्याची मुदत ही ६ महिन्यांची असते; परंतु पक्का परवाना काढण्यासाठी प्रत्यक्ष चाचणी केंद्रावर जाऊन कौशल्य चाचणी द्यावी लागते. त्यात इंग्रजी क्रमांक ८, एच्., तसेच तीव्र चढ आणि उतार यांवर वाहन नियंत्रित करण्यासाठी चालक पुरेसा कुशल आहे कि नाही ? हे पडताळले जाते. ही चाचणी संगणक प्रणालीवर आधारित असल्याने थोडीही चूक झाली, तरी चालक अनुत्तीर्ण होतो.
एप्रिल २०२४ पासून २२ नोव्हेंबर या दिवसापर्यंत १ लाख ८३ सहस्र ५४७ जणांनी ऑनलाईन शिकाऊ परवाने प्राप्त केले आहेत; मात्र पक्का परवाना करण्याच्या चाचणीमध्ये केवळ ८५ सहस्र ५६० वाहनचालक उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण झालेल्यांना ६ महिन्यांत पुन्हा एकदा चाचणी देण्याची संधी दिली जाते; मात्र अनेक वाहनचालक या पुनर्चाचणीसाठी अनुपस्थित राहिले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.