कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हिजाब घालून येणार्‍या १० विद्यार्थिनींवर गुन्हा नोंद !

राज्यभरात ५८ विद्यार्थिनी निलंबित

कर्नाटक सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा प्रकारची कठोरता दाखवल्यावरच कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर वचक बसेल !

तुमकुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) प्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पोषाखावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. तरीही तुमकुरू येथे या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी १० मुसलमान विद्यार्थिनींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथील ‘गर्ल्स एम्प्रेस गव्हर्नमेंट पीयू कॉलेज’च्या या विद्यार्थिनींनी २ दिवस या आदेशाचे उल्लंघन करून महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. हिजाब घालून येणे आणि निदर्शने करणे यांप्रकरणी कर्नाटक राज्यात विविध महाविद्यालयांमधील ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे.

पुढील आदेशापर्यंत राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश

न्यायालयाचा आदेश असतांनाही १९ फेब्रुवारीला अनेक महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तणाव वाढल्याने राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. याविषयी पुढील आदेश देण्यात येईल.

बाहेरील लोकांमुळे भ्रमाची स्थिती ! – मुख्यमंत्री बोम्माई

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आल्याविषयी म्हणाले, ‘‘हिजाबच्या प्रकरणात राज्याबाहेरच्या लोकांच्या सहभागामुळे भ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. जर महाविद्यालय प्रशासन, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून हे प्रकरण सोडवण्यात आले असते, तर ते इतक्यात सुटले असते. मी सर्व प्रकरणांची माहिती घेऊन यावर लक्ष देईन.’’