भरतनाट्यम् नृत्याचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग घेतांना जोधपूर, राजस्थान येथील कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘कु. वेदिका शैलेश मोदी ही जोधपूर, राजस्थान येथील असून ती ९ व्या इयत्तेत शिकत आहे. तिने भरतनाट्यम् नृत्याच्या ५ परीक्षा दिल्या आहेत. ६.२.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कु. वेदिका हिचे भरतनाट्यम् नृत्यातील ‘अलारिपू’ आणि ‘जतीस्वरम्’ (टीप) नामक दोन नृत्यप्रकारांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग घेण्यात आले. त्या वेळी नृत्य करतांना कु. वेदिका मोदी हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

(टीप : ‘अलारिपू’ : ‘अलारिपू’ हा शब्द ‘अलारू्’ या तमिळ शब्दापासून आला असून त्याचा अर्थ आहे ‘उमलणे’. ज्याप्रमाणे फुलाची कळी उमलत जाते, त्याप्रमाणेच या नृत्यरचनेद्वारे नृत्यांगनेचे डोळे, भुवया, मान, खांदे, हात आणि पाय यांच्या हळूवार मोहक हालचालीतून तिचे नृत्य फुलत जाते. अलारिपूचा आरंभ डोक्यापासून होऊन पदन्यासाने त्याची सांगता होते.

जतीस्वरम् : या नृत्याच्या माध्यमातून देवतांना वंदन केले जाते. ‘जति’ म्हणजे बोल आणि ‘स्वरम्’ म्हणजे स्वर. या नृत्य प्रकारासाठी सप्तस्वर सुंदररित्या आणि विविधप्रकारे एकत्रित करून गायिले जातात. या नृत्यप्रकारात हावभाव आणि अभिनय यांचा अंतर्भाव नसतो; परंतु यातील सुंदर स्वररचनेमुळे पुष्कळ आनंद मिळतो.)

भरतनाट्यम् मधील एक मुद्रा करतांना कु. वेदिका मोदी

१. नृत्याचा सराव नसल्यामुळे नृत्याचा प्रयोग करण्याविषयी भीती वाटणे

‘६.२.२०२२ या दिवशी संशोधनाच्या दृष्टीने भरतनाट्यम् या नृत्याच्या ‘अलारिपू’ आणि ‘जतीस्वरम्’ नामक दोन नृत्यप्रकारांचे प्रयोग घेण्याचे ठरले. गेले दीड वर्ष मी घरी असूनही नृत्याचा सराव केला नव्हता किंवा प्रयोग होण्यापूर्वीही माझा पुरेसा सराव झाला नव्हता. त्यामुळे भरतनाट्यम् या शैलीतील नृत्याच्या दृष्टीने आवश्यक अशी ‘अरईमंडी’ (टीप १) स्थिती साधतांना आणि नृत्य करतांना शरिराचा तोल सांभाळून परिपूर्ण नृत्य करण्यास मला अडचण येत होती. ‘मी नृत्य करतांना चुकले, तर चित्रीकरण करणार्‍या साधकांना पुनःपुन्हा चित्रीकरण करावे लागेल’, अशी भीतीही मला वाटत होती.

(टीप १ : अरईमंडी : दोन्ही पायांच्या टाचांत चार बोटांचे अंतर ठेवून पावलांची स्थिती १८० अंश कोनात ठेवतात. त्या वेळी पाय गुडघ्यातून वाकवतात आणि कमरेच्या वरील भाग सरळ ठेवतात. या संपूर्ण स्थितीला ‘अरईमंडी’ (आयतमंडलम) असे म्हणतात.)

कु. वेदिका मोदी

२. नृत्याचा सराव करतांना आणि प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी नृत्य करतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. प्रयोगासाठी नृत्य करतांना प्रार्थना आणि भावप्रयोग करून केल्यावर कुठलाही त्रास न होणे : प्रयोगापूर्वी सराव करतांना मला पुष्कळ धाप लागत होती. थोडे नृत्य केले, तरी थकवा यायचा आणि हातपाय दुखायचे; परंतु प्रयोगासाठी नृत्य करतांना प्रार्थना अन् भावप्रयोग करून नृत्य केल्याने मला धाप लागली नाही. ‘थकवा येणे किंवा हातपाय दुखणे’ याचे प्रमाणही अत्यल्प होते.

२ आ. आरंभी सराव करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समोर आहेत’, याकडे लक्ष न रहाणे; पण प्रयोगाच्या वेळी तो भाव टिकून त्यांना आळवले जाणे : प्रयोगापूर्वी मी सराव करतांना समोर ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच बसले आहेत आणि तेच माझ्याकडून सर्व करवून घेणार आहेत’, असा भाव ठेवून मी नृत्य करू लागले; पण आरंभी माझे लक्ष माझ्या हालचालींकडे आणि पदन्यासाकडे जाऊन तो भाव पूर्णपणे अनुभवण्यास मी न्यून पडत होते. प्रत्यक्षात प्रयोगाच्या वेळी नृत्य करतांना माझा ‘गुरुदेवजी, गुरुदेवजी, गुरुदेवजी’, असा नामजप आपोआप चालू झाला आणि माझे लक्ष हालचाली अन् पदन्यास यांऐवजी नामजपावर केंद्रित झाले.

२ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समोर आहेत’, असा भाव ठेवून नृत्य करतांना भीती नष्ट होऊन ‘अरईमंडी’ स्थितीही साधता येणे : माझ्या मनात ‘मी नृत्य विसरले, तर कसे होईल ?’, असा विचार येऊन मला भीती वाटली. काही वेळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवत आणि भाव ठेवून प्रयोग केल्यावर माझी भीती नष्ट झाली आणि मला ‘अरईमंडी’ स्थिती साधता येऊन शरिराचा तोलही सांभाळता येऊ लागला.

३. संशोधनाच्या दृष्टीने त्रास असणार्‍या साधकांवर नृत्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी प्रयोग करतांना जाणवलेली सूत्रे

३ अ. संशोधनाच्या दृष्टीने त्रास असणार्‍या साधकांवर नृत्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी प्रयोग करतांना साधिकेची दृष्टी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर राहिल्यामुळे तिला निर्भयतेने नृत्य करता येऊन त्यातून आनंद मिळणे : संशोधनाच्या दृष्टीने ‘त्रास असणार्‍या साधकांवर नृत्याचा काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्या साधकांसमोर मला नृत्य करायचे होते. त्या साधकांसमोर नृत्य करण्याच्या कल्पनेने आधी मला पुष्कळ भीती वाटत होती. तेव्हा मला ‘सर्वप्रथम त्रास असणार्‍या साधकांसमोर नृत्य करायला आवडेल कि त्रास नसलेल्या ?’, असे विचारण्यात आले. तेव्हा मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव, आता तुम्हीच मला सुचवा.’ मी डोळे मिटल्यावर मला एक दृश्य दिसले, ‘मी त्रास असलेल्या साधकांच्या समोर नृत्य करत असतांना त्यांच्या त्रासामध्ये वाढ झालेली असतांनाही मी निर्भयपणे नृत्य सादर करत आहे आणि त्या वेळी माझी दृष्टी केवळ गुरुदेवांवरच आहे.’ या दृश्यानंतर मी सांगितले की, मला सर्वप्रथम त्रास असणार्‍या साधकांसमोर नृत्य करायला आवडेल. त्या साधकांच्या समोर नृत्य करतांना मला अजिबात भीती वाटली नाही आणि पुष्कळ आनंद मिळाला.

३ आ. प्रयोगासाठी नृत्य करतांना ‘नृत्य करायला शक्ती देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना होणे : प्रयोगासाठी नृत्य करत असतांना ‘माझी प्राणशक्ती मध्येच अल्प होत आहे’, असे मला जाणवायचे. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे, ‘गुरुदेवा, माझ्यात अजिबातच शक्ती नाही. तुम्हीच माझ्याकडून हे नृत्य करवून घ्या. तुम्हीच हे नृत्य करण्यासाठी मला शक्ती प्रदान करा.’

३ इ. संशोधनाच्या दृष्टीने एकच नृत्य तीन वेळा करावे लागणे आणि प्रत्येक नृत्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना निर्विचार स्थिती अनुभवणे : प्रयोगात संशोधनाच्या दृष्टीने अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी एक नृत्य १५ ते २० मिनिटे करणे आवश्यक होते. माझे नृत्य अल्प कालावधीचे असल्याने संशोधनासाठी मला तेच नृत्य किमान तीन वेळा करावे लागले. प्रत्येक नृत्य संपल्यावर मी कृतज्ञता व्यक्त करायचे. तेव्हा दोनच वाक्ये माझ्या मुखात होती, ‘हे गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून करवून घेतलेत. तुम्हीच मला शक्ती दिलीत.’ काही वेळा अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त होत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले किंवा श्री भवानीमातेचे दर्शन न होता ‘निर्विचार’ स्थिती अनुभवता आली.

४. प्रयोगाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केल्या गेलेल्या विविध प्रार्थना !

अ. प्रयोगात प्रत्येक वेळी नृत्य करण्यापूर्वी ‘हे गुरुदेव, ज्या उद्देशाने हा प्रयोग होत आहे, तो उद्देश सफल होऊ दे. माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित आहे, तसेच नृत्य होऊ दे.’

आ. ‘गुरुदेवा, सर्व साधकांचे मन आणि बुद्धी यांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण तुम्हीच दूर करा. आम्हा सर्व साधकांच्या चारही बाजूंना तुमच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे.’

इ. ‘हे प.पू. गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), आम्ही पामर जीव श्वासही घेण्यास समर्थ नाही, तर आम्ही नृत्य कसे करणार ? त्यामुळे हे गुरुदेवा, तुम्हीच मला हे नृत्य करण्यासाठी शक्ती द्या.’

ई. ‘मी तुमचा पतंग आहे आणि त्या पतंगाची दोरी तुमच्या हातांत आहे. त्या दोरीला तुम्ही घट्ट पकडले आहे आणि ‘या पतंगाची दोरी तुम्ही कधीच तुटू देणार नाही’, अशी श्रद्धा तुम्हीच माझ्या मनात निर्माण करा.’

उ. ‘हे परात्पर गुरुदेव, माझ्याकडून नृत्य, हावभाव, मुद्रा, भाव हे सर्व तुम्हीच करवून घ्या. गुरुदेवा, तुम्हाला जसे अपेक्षित आहे, तसे नृत्य तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या.’

‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच माझ्याकडून अशा विविध प्रार्थना करवून घेत आहेत’, असे मला प्रकर्षाने जाणवले. प्रार्थना संपल्यावर काही वेळा मी निर्विचार स्थिती अनुभवायचे आणि त्या निर्विचार स्थितीतच माझ्याकडून नृत्य केले जायचे.

५. नृत्याच्या वेळी ठेवलेला भाव

अ. नृत्य करतांना ‘हे नृत्य मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे’, हाच भाव मला जाणवत होता.

आ. नृत्याचे संशोधनपर प्रयोग होत असतांना एकदा नृत्य पूर्ण झाल्यावर पुढचे नृत्य करण्यापूर्वी मी काही मिनिटे विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पीत होते. तेव्हा पाणी पीत असतांना ‘हे पाणी नसून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे तीर्थ आहे आणि या अमृतमय तीर्थाच्या माध्यमातून तेच मला शक्ती देणार आहेत’, असा भाव ठेवल्याने मला पुष्कळ शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवत होते.

६. अनुभूती

अ. नृत्यापूर्वी सिद्धता (साजश्रृंगार, पोषाख घालणे, दागिने घालणे इत्यादी) करतांना मला अन्य साधिका साहाय्य करत होत्या. तेव्हा ‘साक्षात् श्री भवानीदेवीच मला सजवत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. नृत्य करतांना मला माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती.

इ. मी नृत्याची सिद्धता करत असतांना माझ्या मानेवर दैवी कण आले आहेत’, असे मला होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांनी सांगितले.

‘हे गुरुदेवा, या अनुभूती तुमच्या चरणी अर्पण करते. या अनुभूती दिल्याबद्दल मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.

– कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के), जोधपूर, राजस्थान. (१०.१.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक